Dhananjay Munde | Manikrao Kokate | Ajit Pawar : शासकीय सदनिकेचा गैरवापर केल्याप्रकरणी नाशिक न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावल्यानंतर, राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. कोकाटे यांचे मंत्रिपद गेल्यानंतर आता त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या शर्यतीत धनंजय मुंडे यांचे नाव आघाडीवर असल्याचे वाटत असले, तरी राजकीय समीकरणे मात्र विजयसिंह पंडित यांच्या बाजूने झुकताना दिसत आहेत. धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळण्यात नेमके अडथळे काय? मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे हे पुन्हा मंत्रिमंडळात येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नुकतीच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेतलेली भेट याच प्रयत्नांचा भाग असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यांच्या मार्गात काही मोठे अडथळे आहेत, यावर एक नजर टाकुयात… गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कनेक्शन : संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा अत्यंत जवळचा मानला जातो. या प्रकरणाचा तपास आणि कायदेशीर गुंतागुंत पाहता, आरोपींना शिक्षा होईपर्यंत मुंडेंना संधी मिळणे कठीण असल्याचे स्पष्ट दिसून येत. पक्षीय रणनीती : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सध्या कोणत्याही वादात न अडकता स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याला संधी देण्याच्या विचारात असल्याचे समजते. अजित पवारांचा नवा ‘ट्रम्प कार्ड’? माणिकराव कोकाटे यांच्या रिक्त झालेल्या जागी बीडमधील गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. त्यांच्या निवडीमागे काही ठोस कारणे आहेत. पवार कुटुंबाशी निष्ठा : ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांचे सुपुत्र आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे बंधू असलेले विजयसिंह पंडित हे पवार कुटुंबाचे अत्यंत विश्वासू मानले जातात. राष्ट्रवादी फुटीनंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली. राजकीय वजन : बीड जिल्ह्यातील अजित पवार गटाचा कारभार हा पंडितांच्या ‘शिवछत्र’ या निवासस्थानातूनच चालतो, असे बोलले जाते. स्वच्छ प्रतिमा : धनंजय मुंडेंच्या तुलनेत विजयसिंह पंडित यांच्याकडे एक नवा आणि वादातीत चेहरा म्हणून पाहिले जात आहे. सुप्रिया सुळे आक्रमक : दरम्यान, कोकाटे यांच्या जाण्याने रिक्त झालेल्या मंत्रिपदावर आता माजी मंत्री धनंजय मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या शक्यतेमुळे शरद पवार गट कमालीचा आक्रमक झाला असून खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. “ज्या नेत्यावर गंभीर आरोप झाले आहेत, अशा धनंजय मुंडेंना गृहमंत्री अमित शाह भेट कशी काय देतात? याचे मला वाईट वाटते,” असे सुळे यांनी म्हटले. आरोपांमध्ये तथ्य असल्याशिवाय सरकारने त्यांचा आधी राजीनामा घेतला होता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “जर धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिले, तर आम्ही शांत बसणार नाही. आम्ही बीडमध्ये जाऊन उपोषण करू आणि राज्यभर तीव्र आंदोलन छेडू,” असा सज्जड दम सुळे यांनी सरकारला दिला आहे.