ICC Warn Bangladesh for T20 World Cup : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ या स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या घडोमोडी घडत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळण्यास नकार देणाऱ्या बांगलादेश क्रिकेट बोर्डाला (BCB) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) कडक शब्दांत तंबी दिली आहे. या स्पर्धेत सहभागी व्हायचे की नाही, याचा अंतिम निर्णय घेण्यासाठी आयसीसीने बांगलादेशला २१ जानेवारी ही शेवटची मुदत (डेडलाईन) दिली आहे. वादाची ठिणगी कशी पडली? बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयने (BCCI) कोलकाता नाईट रायडर्सला मुस्तफिजूर रहमानला संघातून बाहेर काढण्याचे निर्देश दिले होते. यानंतर संतापलेल्या बांगलादेश बोर्डाने ४ जानेवारी रोजी आयसीसीला पत्र लिहून भारतात खेळण्यास असमर्थता दर्शवली. बांगलादेशने त्यांचे ‘गट क’ मधील सामने मुंबई आणि कोलकाता ऐवजी श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली होती. आयसीसीचा स्पष्ट नकार आणि पाकिस्तानची एन्ट्री शनिवारी ढाका येथे झालेल्या बैठकीत आयसीसीने स्पष्ट केले की, स्पर्धेच्या वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नाही. भारतामध्ये खेळाडूंच्या सुरक्षेला कोणताही धोका नसल्याचे लेखी आश्वासनही आयसीसीने दिले आहे. मात्र, या वादात आता पाकिस्तानने उडी घेतली आहे. जर बांगलादेशने माघार घेतली, तर पाकिस्तानही आपल्या सहभागाचा फेरविचार करू शकतो, असे संकेत पीसीबीने (PCB) दिले आहेत. इतकेच नव्हे तर, बांगलादेशच्या सामन्यांचे यजमानपद भूषवण्याची तयारीही पाकिस्तानने दर्शवली आहे. हेही वाचा – मोठी बातमी…! टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यातून धडाकेबाज खेळाडू बाहेर! ‘या’ मालिकेलाही मुकला बांगलादेश बाहेर पडल्यास कोणाची लॉटरी? आयसीसीने दिलेल्या २१ जानेवारीच्या मुदतीपर्यंत जर बांगलादेशने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, तर त्यांना स्पर्धेतून बाहेर काढले जाऊ शकते. अशा परिस्थितीत, आयसीसी क्रमवारीत त्यांच्या खालोखाल असलेल्या स्कॉटलंड संघाला विश्वचषकात खेळण्याची लॉटरी लागू शकते.