Uddhav Thackeray | Eknath Shinde – शिवसेना स्वबळावर महापालिका निवडणुका लढवत आहे. मी २०२२ मध्ये धाडस केले आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीला स्मरून सरकार उलथवून टाकले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे बंधुंवर निशाणा साधला. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजीत जाहीर सभेत ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर मागील 25 वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता राहिली आहे. परंतु, यंदाच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष शहरात स्वतंत्रपणे लढत आहेत. एकनाथ शिंदे म्हणाले, संभाजीनगरमधील बहिणींच्या तोंडचं पाणी पाळवणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची ही निवडणूक आहे. आम्ही लाडक्या बहिणींसाठी सुरु केलेली योजना बंद केली जाणार नाही. उलट आता लाडक्या बहिणींना त्यांच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार दिला आहे. आमच्या सरकारने मुलींचे उच्च शिक्षण मोफत केले आहे. घरातील छोट्या छोट्या समस्यांना महिला भगिनींना सामोरे जावे लागते. त्यांच्यासाठी लाडकी बहिण योजनेचा मोठा फायदा होत आहे. ही योजना बंद करण्यासाठी अनेक लोक कोर्टात गेले. खोडा घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना लाडक्या बहिणींनी 232 नंबरचा जोडा दाखवला. त्यांना त्यांची जागा दाखवली, त्यांना घरी बसवले. ही तुमच्यामध्ये ताकद आहे, असे सांगत महापालिकेत शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. उद्धव ठाकरे मुंबईबाहेर पडायला तयार नाहीत. त्यामुळे राज्यभरातील पक्षाचे कार्यकर्ते एकटे पडले आहेत. तसेच त्यांनी हिंदुत्वाची विचारधारा सोडली असून शहराच्या नामांतराला विरोध करणारे माजी महापौर रशीद खान यांना तिकिट दिले आहे. ते हिंदुत्वाचा खोटा मुखवटा घालून लोकांची फसवणूक करत आहेत. ही धोक्याची घंटा आहे आणि अशा शक्तींना छत्रपती संभाजीनगरपासून दूर ठेवले पाहिजे. आमचे सरकार फेसबुक लाईव्ह नाही, फेस टू फेस कारभार झाला पाहिजे यावर भर देणारे आहे, असेही ते म्हणाले.