Nicolas Maduro | Donald Trump – व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अमेरिकेच्या न्यायालयात आपण दोषी नसल्याची भूमिका निःसंदिग्धपणे मांडली आहे. आपण एका देशाचे अध्यक्ष आहोत आणि आपल्याला पकडण्यात आले आहे. ड्रग तस्करीच्या आरोपाखाली आपण दोषी नाही, असे त्यांनी न्यूयॉर्कमधील मॅनहटन न्यायालयात सांगितले. याच आरोपांखाली मादुरो यांना ट्रम्प प्रशासनाने अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी लष्करी कारवाई केली होती. ‘आपल्याला पकडण्यात आले आहे. मी दोषी नाही. मी निरपराध आहे. मी माझ्या देशाचा अध्यक्ष आहे’, असे मादुरो यांनी न्यायालयात ठामपणे सांगितले. व्हेनेझुएलामधून अमेरिकेत आणले गेल्यानंतर मादुरो आणि त्यांच्या पत्नीला सोमवारी प्रथमच न्यायालयात हजर करण्यात आले होते. एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला अमेरिकेत बळजबरीने आणण्यात आल्यानंतर अशाप्रकारे खटल्याला सामोरे जाण्याची ही पहिलीच वेळ असावी. मादुरो यांना अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर व्हेनेझुएलाची सत्ता अमेरिकेच्या नियंत्रणाखाली राहणार आहे. मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ब्रुकलिन तुरुंगातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये कैद्यांच्या वेशभुषेमध्ये मॅनहटन येथील न्यायालयात आणण्यात आले होते. न्यायालयाचे इंग्रजीत चालणारे कामकाज समजावे, म्हणून त्यांना स्पॅनिश भाषेत अनुवाद करणारे होडफोन लावण्यात आले होते. मादुरो यांनी न्यायालयाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि आपण निरपराध असल्याचा वारंवार पुनरुच्चार केला. मादुरो यांच्यासाठी ९२ वर्षीय न्यायाधीशाची नियुक्ती : मादुरो यांच्या खटल्यासाठी क्लिंटन यांच्या काळात नियुक्त झालेल्या ‘अल्विन हेलेरस्टेन’ यांची न्यायाधीशापदी नियुक्ती करण्यात आली आहे. मादुरो यांनी वारंवार आपल्या निरपराधीपणाचा दाखला देण्याचा प्रयत्न केल्यावर न्यायाधीशांनी त्यांना थांबवले. हे सर्व ऐकवण्यासाठी तुम्हाला वेळ दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. नंतर मादुरो यांचे वकील बेरी पोलक यांनीही त्यांना शांत केले. मादुरो यांच्या अटकेच्या वैधतेला त्यांचे वकील आव्हान देणार आहेत. एखाद्या देशाच्या अध्यक्षांना मिळणारी सुरक्षा मादुरो यांना मिळायला हवी, अशी भूमिका त्यांनी मांडली. पत्नी सिलिया फ्लोरेस यांनीही दोषी नसल्याचे सांगितले : मादुरो यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांनीही आपण निर्दोष असल्याचे न्यायालयात सांगितले. त्यांच्या कपाळावर पट्टी बांधली होती. पकडले जात असताना झालेल्या झटापटीदरम्यान त्या जखमी झाल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. मादुरो आणि ड्रग कार्टेलमध्ये काम करणारे इतर लोक हजारो टन कोकेन देशात पाठवण्यात सहभागी होते, असा आरोप मादुरो पती-पत्नीवर असलेल्या २५ पानांच्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. ड्रग्ज मनी आणि अंडरवर्ल्ड ड्रग्ज तस्करीमध्ये सहभागी असलेल्या तरुणांचे अपहरण, मारहाण आणि खून करणाऱ्याचे आदेश मादुरो आणि त्यांच्या पत्नीने दिल्याचाही आरोप आहे.