Ajit Pawar : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पहिला टप्प्यातील नगरपरिषदा आणि नगरपंयतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी महाविकास आणि महायुतीमधील घटक पक्षांनी कंबर कसली असून, प्रचाराला सुरूवात केली आहे. या निवडणुकीसाठी २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. या सभेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन ते करत आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकतेच अजित पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले असून, घाराशिव येथील आयोजित सभेत बोलताना एक मोठं विधान केले आहे. जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. याविषयी बोलताना जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता असल्याची माहिती वकिलांनी दिल्याचे अजित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले. कोर्टात हे प्रकरण सुरू आहे. मंगळवारी त्यावर निर्णय येण्याची शक्यता आहे, असे सांगत अजित पवार यांनी जिल्हा परिषदा निवडणुका लांबवणीवर जाण्याचे भाकित वर्तवले आहे. याबाबत मंगळवारी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. जिल्हा परिषदेतील ओबीसी आरक्षणावरून हा पेच प्रसंग निर्माण झाला आहे. त्यामुळे निवडणुकांवर टांगती तलावर असणार आहे. सुनावणीकडे लक्ष राज्य निवडणूक आयोगाला सर्वेाच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याआधारे स्थानिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचयातींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकांमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे. त्यामुळे आता मंगळवारी होणाऱ्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांना वेटिंगवर रहावे लागणार आहे. हेही वाचा : kriti sanon: दिल्लीच्या वाढत्या वायुप्रदूषणावर कृति सेनन हिने व्यक्त केली चिंता; काँग्रेस नेत्यानेही दिला पाठिंबा