मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी भाजप उमेदवाराला दिलासादायक निकाल दिला. प्रभाग १७ (अ) मधील भाजपचे उमेदवार निलेश भोजने यांचा अर्ज फेटाळण्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय न्यायालयाने बेकायदेशीर ठरवून रद्द केला आहे. यासोबतच, भोजने यांचे नाव स्वीकृत उमेदवारांच्या यादीत समाविष्ट करून त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी यासदंर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून निलेश भोजने यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला होता. मात्र भोजने यांना हाय कोर्टानं दिलासा दिला असून शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १० (१-डी) चा हवाला देत भोजने यांचा अर्ज फेटाळला होता. त्यांच्या मालमत्तेवर अनधिकृत बांधकाम असल्याचे कारण यासाठी देण्यात आले होते. मात्र, निलेश भोजने यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सदर कलम हे केवळ विद्यमान नगरसेवकांना लागू होते, उमेदवारांना नाही, असा युक्तिवाद भोजने यांच्या वतीने करण्यात आला होता. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकारांचा वापर करताना बेकायदेशीर आणि मनमानी पद्धतीने कृती केल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत. यापूर्वी न्यायालयाने प्रभाग १७ (अ) मधील निवडणुकीला अंतरिम स्थगिती दिली होती, ती आता उठवण्यात आली असून निवडणूक नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार आहे.न्यायालयाने प्रशासनाला आदेश दिले आहेत की, निलेश भोजने यांचे नाव उमेदवारांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी मतपत्रिकांची पुनर्मुद्रण करण्यासह सर्व आवश्यक व्यवस्था तातडीने पूर्ण कराव्यात. या निर्णयामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे.