Nitin Gadkari | Road accident : रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘गुड समॅरिटन’ (मदतनीस) योजनेत ऐतिहासिक बदल केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या योजनेच्या स्वरूपात मोठी सुधारणा जाहीर केली असून, आता मदतीचा हात देणाऱ्या व्यक्तींना अधिक सन्मान आणि आर्थिक बळ मिळणार आहे. योजनेतील प्रमुख बदल आणि सवलती : बक्षीस रकमेत ५ पटीने वाढ: अपघातातील जखमींना तात्काळ रुग्णालयात पोहोचवणाऱ्या व्यक्तीला आता २५,००० रुपये रोख बक्षीस दिले जाईल. (पूर्वी ही रक्कम केवळ ५,००० रुपये होती.) ‘राह-वीर’ सन्मान: मदत करणाऱ्या व्यक्तीला केवळ पैसेच नव्हे, तर ‘राह-वीर’ या पदवीने आणि प्रशस्तीपत्राने सन्मानित केले जाईल. मोफत उपचार (कॅशलेस): अपघाती जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पहिल्या ७ दिवसांसाठी १.५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केले जातील. गोल्डन अवरचे महत्त्व: अपघातानंतरचा पहिला तास (गोल्डन अवर) अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात मदत करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. १० मिनिटांत रुग्णवाहिका पोहोचणार! नितीन गडकरी यांनी राज्यसभेत माहिती दिली की, सरकार अशा प्रगत मॉडेलवर काम करत आहे, ज्यानुसार अपघातस्थळी अवघ्या १० मिनिटांत सुसज्ज रुग्णवाहिका पोहोचेल. यासाठी राज्यांशी करार केले जात असून हायटेक हेल्पलाइन यंत्रणा उभारली जात आहे. पोलीस किंवा कोर्टाची भीती बाळगू नका.! अनेकदा लोक चौकशीच्या भीतीने मदत करायला कचरतात. मात्र, सरकारने पुन्हा स्पष्ट केले आहे की: मदत करणाऱ्या व्यक्तीची सक्तीने चौकशी केली जाणार नाही. त्यांना साक्षीसाठी कोर्टात खेचले जाणार नाही. ही योजना राष्ट्रीय महामार्गांसह राज्य महामार्ग, जिल्हा आणि ग्रामीण रस्त्यांवरील अपघातांसाठीही लागू असेल.