Pratap Sarnaik : २ डिसेंबर रोजी राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. आता उर्वरित २४ नगरपरिषदांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर २१ डिसेंबर या दिवशी निवडणुकांचा निकाल एकत्रितपणे जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयावर आक्षेप घेण्यात आला आहे. २१ डिसेंबरपूर्वीच निकाल जाहीर करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वेाच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून, याबाबत आज सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीत काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. खरंतर या निवडणुकीत अभूतपूर्व असा गोंधळ पाहायला मिळाला. या निवडणुकांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार असल्याचे बोलले जात असले, तरी त्याअगोदर महापालिकांच्या निवडणुका होणार असल्याची चर्चा आहे. यासंबधीच काल गुरुवारी राज्यातील २९ महापालिकांच्या आयुक्तांची व्हिडीओ कॅान्फरसिंगद्वारे आयोगासोबत बैठक पार पडली. या सगळ्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवेसेनेच्या मंत्र्याने थेट आगामी महापालिका निवडणुका कधी जाहीर होणार याबाबत संकेत देणारे विधान केले आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या. अखेर या निवडणुकांना मुहूर्त मिळाला आहे. पण त्यातही नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीत मोठा गोंधळ उडल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत अशा कोणत्याही गोष्टी घडू नये, असे थेट मुख्यमंत्र्यांनी आयोगाला ठणकावून सांगितले आहे. नेमकं काय म्हणाले प्रताप सरनाईक? महापालिका निवडणुकांचे वेध सर्वांनाच लागले असून, मतदारयाद्या येत्या १० डिसेंबरपर्यंत प्रसिद्ध होणार आहेत. २२ डिसेंबरला प्रभागनिहाय मतदारयाद्या देण्यात येणार आहेत. यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १५ ते २० डिसेंबरदरम्यान आचारसंहिता लागू शकते. तसेच १५ ते २० जानेवारीपर्यंत निवडणुकाही होऊ शकतात, असे विधान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकांसह राज्यातील इतर महापालिका निवडणुकांचे उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पणाचा कार्यक्रम मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते गुरुवारी पार पडला. हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना महापालिका निवडणुकांबाबत वरील विधान केले. निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना कधीही विकासकामे काम करत नाही. ३६५ दिवस आम्ही सर्वसामान्य जनतेत असतो. २४ तास नागरिकांमध्ये राहून आम्ही काम करतो. त्यामुळे निवडणुका कधीही होऊ देत, आमचे शिवसैनिक नेहमीच सज्ज असतात, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे. आयोगापुढे मोठे आव्हान गेल्या चार ते पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या. अखेर या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. पण काही ठिकाणी आरक्षणाचा पेच पुन्हा एकदा उभा राहिला आहे. सर्वेाच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या निवडणुका वेळेत पूर्ण करणे आयोगापुढे मोठे आव्हान असणार आहे. हेही वाचा : ८ डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन; विधिमंडळ परिसरात चोख पोलीस बंदोबस्त, नागपूरात ३३ मोर्चे धडकणार