Hardik Pandya set for comeback : सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे, ज्यातील पहिला सामना भारताने जिंकला आहे. वनडेनंतर दोन्ही संघात टी-२० मालिकाही खेळवली जाणार आहे, ज्यासाठी भारतीय संघ अजून जाहीर झालेला नाही. याच दरम्यान, संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याच्याबद्दल एक अत्यंत सकारात्मक बातमी समोर आली आहे. सूत्रांनुसार, हार्दिक पंड्या पूर्णपणे फिट झाला असून, तो लवकरच भारतासाठी पुन्हा मैदानात उतरताना दिसू शकतो. हार्दिक पंड्याची क्रिकेटमध्ये लवकरच वापसी – पीटीआयच्या अहवालानुसार, आशिया चषकात जखमी झालेल्या हार्दिक पंड्याला टी-२० फॉरमॅटमध्ये पुनरागमनाची परवानगी देण्यात आली आहे. दुखापतीनंतर तो सातत्याने रिहॅब करत होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका सुरू होण्यास थोडा अवधी आहे, पण त्यापूर्वी हार्दिक देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसू शकतो. हार्दिक पंड्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बडोदा संघाकडून खेळण्याची दाट शक्यता आहे. हैदराबाद येथे मंगळवारी बडोदा आणि पंजाब यांच्यात होणाऱ्या सामन्यात तो मैदानात उतरल्यास, जवळपास अडीच महिन्यांनंतर तो क्रिकेटमध्ये परतणार आहे. निवड समितीची हार्दिकच्या फिटनेसवर बारीक नजर – टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच केली जाईल, मात्र निवडकर्त्यांचे लक्ष सध्या हार्दिकच्या फिटनेसवर आहे. ४ डिसेंबर रोजी बडोदा आणि गुजरात यांच्यात होणाऱ्या सामन्यातही हार्दिक पंड्या खेळू शकतो. बीसीसीआयचे निवडकर्ता प्रज्ञान ओझा हे हा सामना लाइव्ह पाहण्यासाठी हजर राहण्याची शक्यता आहे, जेणेकरून ते हार्दिकच्या मॅच फिटनेसची बारकाईने तपासणी करू शकतील. जर सर्व काही व्यवस्थित झाले, तर हार्दिक दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माचे पुन्हा मागचे दिवस पुढे! पहिल्या वनडेनंतरचा ‘तो’ VIDEO होतोय व्हायरल शुबमन गिलच्या उपलब्धतेवर संभ्रम कायम – दुसरीकडे, शुबमन गिलच्या उपलब्धतेबद्दल अजूनही अनिश्चितता आहे. गिलच्या फिटनेसचे संपूर्ण मूल्यांकन अजून व्हायचे आहे. पीटीआयच्या अहवालानुसार, शुबमन लवकरच बंगळूर येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे पोहोचेल, जिथे त्याच्या हालचाली आणि रिकव्हरीची तपासणी केली जाईल. त्याला इंजेक्शन ट्रीटमेंटनंतर २१ दिवसांचा आराम आणि रिहॅबचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या फलंदाजी करताना त्याला काही अडचण आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. अंतिम निर्णय त्याच्या ट्रेनिंग आणि फिटनेस टेस्टनंतरच घेतला जाईल.