Santosh Dhuri : येत्या काही दिवसांवर मुंंबई महापालिकेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. भाजपमध्ये इन्कमिंग वाढत चालले असून, मुंबई महापालिका निवडणुकीच्या घोषणेनंतर अनेक बडे नेते भाजपात सामील होताना दिसत आहेत. आता मुंबईतील मनसेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे आणि राज ठाकरे यांचा विश्वासू समजले जाणारे संतोष धुरी भाजपाच्या वाट्यावर असून, त्यांनी काल रात्री मंत्री नितेश राणे यांच्यासमेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर चर्चांना उधाण आले असून, त्यांनी या भेटीविषयी आपली पहिली प्रतिक्रिया आज मंगळवारी माध्यमांशी बोलताना दिली. माझी कदर करण्यात आली नाही, असे खळबळजनक विधान यावेळी संतोष धुरी यांनी केले आहे. या विधानातून त्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याच्या पार्श्वभूमीवर संतोष धुरी यांनी माहिती दिली. “मी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. माझ्यासोबत नितेश राणे होते. मला तिथे जाऊन बरं वाटलं. मला त्यांनी तात्काळ भेट दिली. त्यामुळे मला बरं वाटलं. त्यांनी माझी कदर केली.” असे ते म्हणाले. पुढे बोलताना संतोष धुरी म्हणाले, “नितेश राणे यांनी परवा फोन केला होता. ते सिंधुदुर्गावरुन माझ्यासाठी मुंबईत आले. त्यांना माझ्यात काहीतरी वाटलं असेल. त्या कारणास्तव तिथे आले, मला भेटले आणि नंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊया असे म्हटले. त्यानंतर त्यांची सदिच्छा भेट घेतली. अर्धा तास आम्ही चर्चा केली,” अशी माहिती भेटीबाबत संतोष धुरी यांनी दिली. तसेच राजकीय भूमिका दुपारनंतर जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संतोष धुरी हे भाजपच्या वाट्यावर असल्याचे दिसत आहेत. संतोष धुरी यांना महापालिका निवडणुकीत तिकीट मिळाले नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा रंगली असून यावर देखील त्यांनी भाष्य करत मी अजितबात नाराज नाही, असे सांगितले. माझी आगामी राजकीय दिशा मी आज दुपारी स्पष्ट करेन, असे देखील संतोष धुरी म्हणाले आहेत. त्यामुळे ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत राज ठाकरे यांचा मनसैनिक भाजपवासी होणार असल्याने त्यांना मोठा धक्का बसणार आहे. हेही वाचा : ‘शेख हसीना यांना भारतात आश्रय दिल्याने हिंदूंवर हल्ले…’ ; स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं मोठं विधान