रांजणगाव गणपती : रांजणगाव – कारेगाव जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय समीकरणांनी ‘आधे इधर – आधे उधर’ अशी स्थिती निर्माण केली आहे. २०१७ च्या निवडणुकीत जे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी होते, ते आज एकाच गोटात उभे असताना, त्याकाळी पाठीशी उभे राहिलेले अनेक कार्यकर्ते व गट आज विरोढात उभे ठाकले आहेत. स्वाती पाचुंदकर आणि मनीषा पाचंगे या २०१७ मध्ये एकमेकींच्या विरोधात निवडणूक लढल्या होत्या. गट, पक्ष आणि विचारांनी ती लढत चांगलीच गाजली होती. मात्र, आज चित्र पूर्णपणे बदलले असून, दोघीही एकाच पक्षातून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढवत आहेत. त्यांची ही नव्याने जुळलेली गट्टी राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय झाला आहे. याउलट, २०१७ साली मनिषा सतीश पाचंगे यांना रांजणगावातून ज्यांनी भरभरून साथ दिली, जमेल तेवढे पाठबळ दिले त्याच आज विरूद्ध दिशेला उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये खऱ्या अर्थाने ‘आधे इधर – आधे उधर’ असे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, २०१७ मध्ये पाचुंदकर कुटुंब राजकीयदृष्ट्या एकसंध होते. पण आज समीकरणे बदलली आहेत. स्वाती पाचुंदकर यांच्यासमोर आता मानसिंग पाचुंदकर यांच्या पत्नी ज्योती पाचुंदकर यांनी थेट आव्हान उभे केले आहे. घरच्या गोटातील हीच थेट टक्कर असल्याने स्थानिक पातळीवर अधिकच गोंधळलेले, गुंतागुंतीचे राजकीय वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व बदलांमुळे आगामी निवडणूक रांजणगाव – कारेगाव क्षेत्रात अत्यंत चुरशीची, अनिश्चित आणि रोमांचक होणार यात शंका नाही. राजकीय पटावर कोण कोणासोबत आणि कुणाविरोधात दिसणार? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.