Sai Sudharsan Injury in Vijay Hazare Trophy : आयपीएल २०२६ चा हंगाम मार्चमध्ये सुरू होणार आहे, मात्र त्यापूर्वीच गुजरात टायटन्सच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. संघाचा हुकुमी एक्का आणि युवा भारतीय फलंदाज साई सुदर्शन याला विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेदरम्यान गंभीर दुखापत झाली असून, तो पुढील दोन महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहण्याची शक्यता आहे. धाव घेताना बरगडीला झाली दुखापत – विजय हजारे ट्रॉफीमध्ये तामिळनाडू आणि मध्य प्रदेश यांच्यातील सामन्यादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. अहमदाबाद येथे झालेल्या या सामन्यात एक धाव पूर्ण करण्यासाठी सुदर्शनने ‘डाइव्ह’ मारली. दुर्दैवाने या डाइव्हमुळे त्याच्या उजव्या बाजूच्या सातव्या बरगडीला (Anterior Cortex) फ्रॅक्चर झाले आहे. या दुखापतीनंतर तो तातडीने मैदानातून बाहेर पडला. रणजी ट्रॉफीला मुकणार, पण आयपीएलचे काय? २४ वर्षीय साई सुदर्शन आता चालू देशांतर्गत हंगामातील उर्वरित सामन्यांना मुकणार आहे. तामिळनाडू संघासाठी विजय हजारे ट्रॉफीसोबतच आगामी रणजी ट्रॉफीमध्येही तो खेळू शकणार नाही. मात्र, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी तंदुरुस्त होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी हा काहीसा दिलासादायक भाग आहे. हेही वाचा – Shiv Sena UBT : ‘मुस्तफिजूरची KKR मधून हकालपट्टी करा, अन्यथा IPL…’, शिवसेनेचा (ठाकरे) शाहरुखसह BCCIला इशारा ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये उपचार सुरू – बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ डिसेंबर रोजी सुदर्शन बंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये दाखल झाला आहे. तिथल्या स्कॅन रिपोर्टमध्ये फ्रॅक्चरची पुष्टी झाली आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी त्याला स्पर्धेच्या सुरुवातीला सराव सत्रादरम्यान किरकोळ मार लागला होता. सध्या तो तज्ज्ञांच्या देखरेखीखाली असून शरीराच्या खालच्या भागाच्या तंदुरुस्तीवर (Lower Body Strength) काम करत आहे. हेही वाचा – South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेचा टी-२० विश्वचषकासाठी तगडा संघ जाहीर; २०२४ चा बदला घेण्यासाठी सज्ज! पुनरागमन कधी? बरगडीचे फ्रॅक्चर पूर्णपणे बरे होण्यासाठी साधारणतः ६ ते ८ आठवड्यांचा कालावधी लागतो. पुढील ७ ते १० दिवसांत सुदर्शन शरीराच्या वरच्या भागाचे ट्रेनिंग सुरू करू शकेल. सुदर्शनसाठी हा काळ आव्हानात्मक आहे, कारण मागील ११ कसोटी डावांपैकी ९ डावात त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. आता दुखापतीतून सावरून तो आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.