मंचर : शासकीय हमीभाव खरेदी योजना सन 2025-26 अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती मंचरच्या चांडोली खुर्द येथील उपबाजारात नाफेड हमीभाव केंद्र सुरू झाल्याने हजारो सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना त्याचा फायदा होणार आहे. अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती मंचरचे सभापती निलेश थोरात यांनी दिली. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने सोयाबीन केंद्र सुरु करण्यात आले. शेतकरी अर्जुन धोंडीबा ढमढेरे (रा. पिंपळगाव घोडे) यांच्या सोयाबीन पोत्याची व वजन माप काट्याचे पूजन सभापती निलेश थोरात यांच्या हस्ते करून चांडोली उपबाजारात सोयाबीन खरेदीचा प्रारंभ झाला. त्यावेळी सभापती निलेश थोरात बोलत होते. बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे, बाजार समितीचे संचालक संदीप थोरात, राजूशेठ भंडारी, अरुण बांगर, गणेश वायाळ, लक्ष्मण बाणखेले, पणन मंडळाचे अधिकारी डी. डी. देशमुख, नाफेडचे अधिकारी गणेश बांगर, बाजार समितीचे सचिव सचिन बोर्हाडे आदी मान्यवर व सोयाबीन उत्पादक शेतकरी उपस्थित होते. सभापती निलेश थोरात म्हणाले, सोयाबीनला वाढीव भाव मिळाला आहे. यामुळे खाश्रगी व्यापार्यांकडून सोयाबीन खरेदी करताना बाजारभाव व वजनात शेतकर्याची होणारी फसवणूक टळणार अज्ञसीफ रविवार वगळता दररोज सकाळी दहा ते पाच या वेळेत 5 हजार 328 रुपये प्रति क्विंटल या बाजारभावाने सोयाबीन खरेदी केली जाईल. चार ते पाच दिवसांत शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. सोयाबीन खरेदीच्या अटी आर्द्रता 12 टक्केपेक्षा कमी असावी. काडीकचरा, माती दगड नसावेत. 7/12 वर सोयाबीनची सन 2025-26 ची पिक पाहणी नोंद असावी. 31 डिसेंबर 2025 पर्यंत सोयाबीनची ऑनलाइन नोंदणी सुरू राहील. 15 फेब्रुवारी2026 पर्यंत सोयाबीन खरेदी केले जाईल. बायोमेट्रिक नोंदणीसाठी शेतकर्यांनी स्वतः आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत, सातबारा व 8 अ उतारा घेऊन उपस्थित रहावे. एकरी 940 किलोग्रॅमची सोयाबीनची खरेदी केली जाईल. असे बाजार समितीचे सचिव सचिन बोर्हाडे यांनी सांगितले.