Congress – महायुतीला सत्तेमध्ये येवून एक वर्ष पूर्ण होत असूनही त्यांनी अजूनही शेतकरी कर्जमाफी व रोजगार या मुद्द्यांवर दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केलेली नसल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. तसेच नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीमध्ये गंभीर अनियमितता झाली असून निवडणूक आयोगाने यावर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली. भाजप, राष्ट्रवादी अजित पवार व शिंदेसेनेने एकत्र निवडणूक लढविताना 288 सदस्य असलेल्या विधानसभेत 235 जागा निवडून आणल्या होत्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. उद्या महायुती सत्तेत येवून एक वर्ष पूर्ण होत असताना, कॉंग्रेसने महायुतीने वर्षभरात केलेल्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. या संदर्भात बोलताना प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले की, महिलांसाठी आर्थिक मदत, शेतकरी कर्जमाफी आणि तरुणांसाठी नोकरी या संदर्भात महायुतीने निवडणूकीपूर्वी आश्वासने दिली होती मात्र त्यापैकी कोणत्याही आश्वासनांची पूर्तता केली नाही. राज्यात गुन्हेगारीचे जाळे आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला असून प्रमुख सर्वजनिक मुद्यांकडे देखील सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे महायुतीचे पहिले वर्ष हे आर्थिक आणि बौद्धिक दिवाळखोरीचे वर्ष असल्याची टीका देखील त्यांनी केली. त्यामुळेच निधी मिळाला नाही… सपकाळ म्हणाले की, मे ते ऑक्टोबर दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस झाला होता. अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे आणि शेतीचे नुकसान झाले आहे, तरीही राज्य सरकारने जाहीर केलेल्या ३३,००० कोटी रुपयांच्या मदत पॅकेजबाबत कोणतीही स्पष्टता दिसून आली नाही. राज्य सरकारने केंद्राकडे आर्थिक मदतीचा प्रस्ताव पाठवला नाही आणि त्यामुळे त्यांना निधी मिळाला नाही. यावरून शेतकऱ्यांना मदत करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे दिसून येते, असा दावा सपकाळ यांनी केला. निवडणूकीवर प्रश्नचिन्ह ! मंगळवारी झालेल्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकांमध्ये देखील अनियमितता झाल्याचा सपकाळ यांनी दावा केला आहे. ते म्हणाले की, गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगरपंचायतीमध्ये निवडणूक अधिकारी यांनी मतदानाच्या वेळेनंतर 17 ईव्हीएमचे सील उघडले व मतदानाला परवानगी दिली. मात्र या संदर्भात कोणताही एफआयआर नोंदविण्यात आलेला नाही. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाली आहे, असे ते म्हणाले.