CNG – PNG price : येत्या नवीन वर्षात (२०२६) सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. १ जानेवारी २०२६ पासून सीएनजी (CNG) आणि घरगुती पीएनजी (PNG) च्या किमतींमध्ये घट होणार आहे. पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाने (PNGRB) नवीन ‘युनिफाईड टॅरिफ‘ धोरण जाहीर केले असून, यामुळे गॅसच्या दरात मोठी कपात होणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा चांगलाच फायदा होणार आहे. दरम्यान, या निर्णयाचा नेमका फायदा काय आणि दर कसे कमी होतील? यावर देखील एक नजर टाकुयात…. १. नवीन टॅरिफ स्ट्रक्चर आणि दरातील घट : PNGRB चे सदस्य ए.के. तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस वाहतुकीच्या दरांचे (Tariff) तर्कसंगतीकरण करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना प्रति युनिट २ ते ३ रुपयांची बचत होणार आहे. झोनमध्ये बदल: पूर्वी अंतरावर आधारित ३ झोन होते, ते आता कमी करून २ झोन करण्यात आले आहेत. दरातील कपात: झोन १ साठी आता ५४ रुपये टॅरिफ असेल, जे यापूर्वी ८० ते १०७ रुपयांच्या दरम्यान होते. प्रक्रिया सुलभ: झोनची संख्या कमी झाल्यामुळे टॅरिफ सिस्टीम अधिक सोपी आणि पारदर्शक झाली आहे. २. कोणाला मिळणार थेट लाभ? या निर्णयाचा फायदा देशातील ४० गॅस वितरण कंपन्यांच्या अंतर्गत येणाऱ्या ३१२ भौगोलिक क्षेत्रांमधील कोट्यवधी ग्राहकांना होणार आहे. वाहतूक क्षेत्र: सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि खासगी कार चालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल. गृहिणींना फायदा: स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या पाईप गॅसच्या (PNG) किंमती कमी झाल्यामुळे घरगुती बजेट सुधारण्यास मदत होईल. ३. पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सरकारी पुढाकार : सरकार नैसर्गिक गॅसचा वापर वाढवण्यासाठी केवळ नियमन करत नसून, एक ‘सुविधा देणारा’ (Facilitator) म्हणून काम करत आहे: राज्य सरकारांशी समन्वय: अनेक राज्ये आता ‘व्हॅट’ (VAT) कमी करत असून मंजुरी प्रक्रिया जलद करत आहेत. देशव्यापी कव्हर: सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांना देशभरात गॅस नेटवर्क विस्तारण्यासाठी परवाने देण्यात आले आहेत. परवडणारा गॅस: ग्राहकांना स्वस्त दरात गॅस मिळावा यासाठी PNGRB या नवीन दरांच्या अंमलबजावणीवर स्वतः लक्ष ठेवणार आहे. दरम्यान, येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच होणारी ही दरवाढ कपात महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक मोठी “न्यू इयर गिफ्ट” ठरणार आहे. आणि याचा थेट फायदा नागरिकांच्या खिशाला होणार आहे.