Free beer | Vietnam hotels : भारतात मद्याच्या किंमती वाढत असताना मद्यप्रेमींच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. मात्र, जगात असाही एक देश आहे जिथे परिस्थिती नेमकी उलट आहे. या देशात पिण्याच्या पाण्याच्या बाटलीसाठी तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागतील, पण बिअर मात्र चक्क मोफत किंवा अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध होते. हा देश म्हणजे पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेला ‘व्हिएतनाम’. पाणी महाग आणि बिअर स्वस्त? व्हिएतनाममध्ये ‘पाणी महाग आणि बिअर स्वस्त’ असे चित्र पाहायला मिळते. याचे मुख्य कारण म्हणजे तेथील स्थानिक बिअर उत्पादन आणि संस्कृती. व्हिएतनाममध्ये ५०० मिली पाण्याच्या बाटलीची किंमत साधारणपणे ३०,००० डोंग (भारतीय चलनात अंदाजे १०० रुपये) आहे. याउलट, बिअरचा एक ग्लास फक्त ५,००० ते १०,००० डोंगमध्ये (अंदाजे १८ ते ३५ रुपये) मिळतो. याच कारणामुळे व्हिएतनाममधील अनेक हॉटेल्समध्ये मुक्कासाला येणाऱ्या पाहुण्यांना पाण्याच्या बाटलीऐवजी विशिष्ट वेळेत मोफत बिअर दिली जाते. ‘बिया होई’ (Bia Hoi): जगातील सर्वात स्वस्त बिअर व्हिएतनाममध्ये इतकी स्वस्त बिअर मिळण्यामागे ‘बिया होई’ या स्थानिक ब्रँडचा मोठा वाटा आहे. ही बिअर स्वस्त असण्याची काही खास कारणे आहेत: १. ताजे उत्पादन: ही बिअर दररोज स्थानिक ब्रुअरीजमध्ये तयार केली जाते आणि त्याच दिवशी ताजी विकली जाते. २. पॅकेजिंगचा खर्च नाही: ‘बिया होई’ बाटलीबंद केली जात नाही. ती थेट बॅरलमधून ग्लासमध्ये दिली जाते, ज्यामुळे बाटली किंवा कॅनचा खर्च वाचतो. ३. कमी अल्कोहोल: यात अल्कोहोलचे प्रमाण केवळ २ ते ३ टक्के असते आणि ती मुख्यत्वे तांदळापासून बनवली जाते. ४. कमी कर: स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार या बिअरवर अत्यंत कमी कर आकारते. पर्यटकांसाठी पर्वणी! व्हिएतनाममधील रस्त्यांच्या कडेला असलेल्या लहान हॉटेल्सपासून ते मोठ्या रेस्टॉरंट्सपर्यंत सर्वत्र ‘बिया होई’ची क्रेझ पाहायला मिळते. आशियातील अनेक देशांमध्ये दिवसातील ठराविक वेळेत (Happy Hours) पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मोफत बिअर देण्याची प्रथा लोकप्रिय होत आहे.