नागपूर – गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांनी राज्यात उच्छाद घातला आहे. हे बिबटे शेतात, मानवी वस्तीत अगदी शहरी भागातील वसाहतींमधून मुक्त संचार करू लागले आहेत. तसेच या बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या बिबट्यांचा प्रश्न सध्या नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही चांगलाच गाजत आहे. त्यातच आता राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपचे समर्थक आमदार रवी राणा यांनी एक अजब मागणी केली आहे. ‘बिबट्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा द्या’, अशी मागणी रवी राणा यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे. आज विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिबट्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अमरावतीमध्येसुद्धा बिबट्यांचा वावर आहे. नागपूर असो, मुंबई असो शहरी भागात ज्याप्रमाणे बिबटे येत आहेत ते पाहता आता बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा दिला पाहिजे. यासंदर्भात मी स्वत: आज वनमंत्री गणेश नाईक यांनी भेट घेतली. तसेच बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवा, अशी मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्याप्रमाणे बाबा आमटे यांनी त्यांच्याकडील वनांमध्ये बिबटे पाळले, अनेक ठिकाणी खासगी वनांमध्ये बिबट्यांचं पालन पोषण सुरू आहे. वनताराच्या माध्यमातून अंबानी परिवाराने अनेक वन्यप्राण्यांना संरक्षण दिलं आहे. आज तुम्ही अनेक घरात पाहिलं तर तिथे खतरनाक जातीचे कुत्रे पाळले जात आहेत. त्यापेक्षा जर आपण बिबट्यांचं लहानपणापासून पालन केलं, तर बिबटेसुद्धा सुरक्षित राहतील आणि माणसंसुद्धा सुरक्षित राहतील आणि मोठ्या प्रमाणावर नसबंदी करायची आवश्यकता भासणार नाही, असा प्रकारचा सल्ला मी वनमंत्री गणेश नाईक यांना दिला आहे.