Ghodbunder Accident – ठाण्यातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर रोडवरील गायमुख घाटात शुक्रवारी सकाळी एका भरधाव कंटेनरने भीषण धुमाकूळ घातला. उतार उतरताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने या कंटेनरने दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या तब्बल ११ वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले असून अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेमुळे घोडबंदर रस्त्यावर सुमारे दोन तास वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. सुमारे ३५ ते ४० टन सिमेंटने भरलेला एक अवजड कंटेनर गायमुख घाटातून ठाणे शहराच्या दिशेने येत होता. उतारावर अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा कंटेनर थेट दुभाजक तोडून बोरीवलीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर शिरला आणि समोरून येणाऱ्या वाहनांवर आदळला. या धडकेचा वेग इतका प्रचंड होता की अनेक मोटारसायकल आणि कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेतली.