Gambhir Surya hid decision from Shubman Gill about dropping : भारतीय क्रिकेट संघाचा युवा खेळाडू शुबमन गिलला आगामी टी-२० विश्वचषकाच्या संघातून अनपेक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. केवळ १५-२० तासांपूर्वीपर्यंत संघाचा उपकर्णधार असलेला गिल आता विश्वचषक संघात नसेल, या बातमीने क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. मात्र, या निर्णयापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे, संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने हा निर्णय दोन दिवस गिलपासून लपवून ठेवला होता. नेमकं प्रकरण काय? शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील शेवटच्या टी-२० सामन्यानंतर शनिवारी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या यादीत गिलचे नाव गायब होते आणि संजू सॅमसनची सलामीवीर म्हणून संघात वापसी झाली. पीटीआयच्या अहवालानुसार, लखनऊमधील चौथ्या टी-२० सामन्यापूर्वीच गिलला विश्वचषक संघात स्थान न देण्याचा निर्णय मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी घेतला होता. गिलला अंधारात का ठेवले? अहवालात दावा करण्यात आला आहे की, पायाच्या दुखापतीमुळे गिल शेवटचा टी-२० सामना खेळू शकला नव्हता, तरीही तो संघात उपस्थित होता. इतकेच नाही तर गिल पेनकिलर इंजेक्शन घेऊन खेळण्यास तयार होता, तरीही त्याला विश्रांतीच्या नावाखाली बाहेर बसवण्यात आले. या ४८ तासांच्या काळात गंभीर किंवा सूर्या यांपैकी कोणीही गिलला त्याच्या डच्चूबाबत कल्पना दिली नाही. शनिवारी संघाची घोषणा होण्याच्या काही मिनिटे आधी अजित आगरकर यांनी फोन करून गिलला या निर्णयाची माहिती दिली. हेही वाचा – Devon Conway : डेव्हॉन कॉन्वेने रचला इतिहास! एकाच सामन्यात ‘हा’ डबल धमाका करणारा पहिलाच खेळाडू गंभीर-गिल संबंधांवर परिणाम होणार? एकीकडे शुबमन गिलला कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवून भविष्यातील नेतृत्व सोपवले जात असताना, दुसरीकडे टी-२० फॉरमॅटमधून त्याला अशा प्रकारे बाहेर काढल्याने चर्चांना उधाण आले आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे गिल आणि व्यवस्थापनातील संबंध बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संघात सर्व काही आलबेल असल्याचे सांगितले जात असले तरी, या निर्णयाचा परिणाम कसोटी संघाच्या वातावरणावर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.