Kapil Dev statement on Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज कर्णधार आणि १९८३ च्या विश्वचषक विजयाचे शिल्पकार कपिल देव आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी भारतीय संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याबद्दल एक मोठे विधान केले असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. “गंभीर हा भारतीय संघाचा मॅनेजर असू शकतो, पण कोच (प्रशिक्षक) नाही,” असे मत कपिल देव यांनी व्यक्त केले आहे. नेमका आक्षेप काय? इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या शताब्दी सत्रात बोलताना कपिल देव यांनी प्रशिक्षक या संज्ञेवर भाष्य केले. त्यांच्या मते, क्रिकेटपटूंना खऱ्या अर्थाने कोचिंगची गरज शाळा आणि महाविद्यालयीन स्तरावर असते. कपिल देव म्हणाले, “आज ‘कोच’ हा शब्द खूप सर्रास वापरला जातो. गौतम गंभीर लेग स्पिनर किंवा यष्टीरक्षकाचा कोच कसा असू शकतो? जेव्हा खेळाडू राष्ट्रीय स्तरावर पोहोचतात, तेव्हा त्यांना प्रशिक्षणापेक्षा नियोजनाची अधिक गरज असते. गंभीर या संघाला मॅनेज करू शकतो, पण तांत्रिकदृष्ट्या त्यांना कोचिंग देऊ शकत नाही.” गंभीरच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह – गौतम गंभीरचा मुख्य प्रशिक्षक म्हणून प्रवास आतापर्यंत आव्हानात्मक राहिला आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर, नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेतही भारताला ०-२ असा पराभव स्वीकारावा लागला. या खराब कामगिरीमुळे गंभीरवर सातत्याने टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर कपिल देव यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. हेही वाचा – Sourav Ganguly : मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ गांगुलींच्या जिव्हारी; अर्जेंटिना फॅन क्लबच्या अध्यक्षावर मानहानीचा दावा कॅप्टन आणि मॅनेजरची भूमिका – कपिल देव यांनी पुढे स्पष्ट केले की, वरिष्ठ पातळीवर संघ व्यवस्थापकाचे काम खेळाडूंना आत्मविश्वास देणे आणि त्यांना सोयीस्कर वातावरण उपलब्ध करून देणे हे असते. “जो खेळाडू शतक ठोकतो, त्याच्यासोबत जेवायला कोणालाही आवडेल. पण खरा कॅप्टन किंवा मॅनेजर तोच असतो, जो फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूंसोबत वेळ घालवून त्यांचा आत्मविश्वास वाढवतो. संघाला एकत्र बांधून ठेवणे हीच खरी भूमिका आहे,” असेही त्यांनी नमूद केले.