पुणे : राज्यभरात आता महापालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. अशातच आता पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने मोठा डाव टाकला आहे. भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढणार असून माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यावर पुणे शहर निवडणूक प्रमुखपदी जबाबदारी सोपवली आहे. याबाबतची घोषणा कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. लवकरच महापालिका निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीसाठीच्या पुणे शहर कोअर कमिटीची बैठक रविवारी मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, महापालिका निवडणुकांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नियमित प्रक्रियेचा भाग म्हणून ही प्राथमिक बैठक झाली. भाजपची यंत्रणा बाराही महिने कार्यरत असते. परंतु, निवडणुकीच्या दृष्टीने शहर पातळीवर आणखी काय करता येईल, याचे प्राथमिक नियोजन या बैठकीत झाले. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या पाहता इच्छुकांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासून दोन दिवस शहर कार्यालयात अर्ज मागवले जातील. हे अर्ज प्रदेश कार्यालयाकडे पाठवले जातील. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार कोअर कमिटी चर्चा करून पुढील निर्णय घेईल, असंही मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले. गणेश बिडकर यांच्यावर मोठी जबाबदारी यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुरलीधर मोहळ यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढणार आहोत, निवडणुकीचे जे रोजचं संचालन असतं त्याचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर आहेत. तसेच शहराचे अध्यक्ष धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले यांच्यासह सात जणांची समिती मिळून आम्ही या निवडणुकाला सामोरे जाणार आहोत. पण आमचं नेतृत्व मुरलीधर मोहोळ करणार आहेत, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. कोण आहेत गणेश बिडकर? गणेश बिडकर हे पुणे महापालिकेतील एक अनुभवी राजकारणी म्हणून ओळखले जातात. ते भाजपचे दीर्घकालीन कार्यकर्ते असून, गेल्या दोन दशकांपासून स्थानिक राजकारणात सक्रिय आहेत. पुणे शहरातील विविध प्रभागांमध्ये त्यांचा प्रभाव आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत बिडकर यांनी भाजपच्या गट नेत्याच्या भूमिकेत पक्षाला बहुमत मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर २०२२ च्या निवडणुकीतही ते सभागृह नेते म्हणून पक्षाच्या रणनीती आखण्यात अग्रेसर होते. बिडकर यांच्या नेतृत्वात भाजपने महानगरपालिकेमध्ये ८२ हून अधिक जागा जिंकल्या होत्या. राजकीय कारकीर्द काय? राजकीय कारकीर्दीची सुरुवात २००० च्या दशकाच्या सुरुवातीला पुणे शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून झाली. बिडकर हे मूळचे पुणे जिल्ह्यातील एका साध्या कुटुंबातील असून, त्यांनी सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमधून राजकीय संस्कार घेतले. २०१२ मध्ये ते प्रथम पीएमसी चे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि नंतर विविध समित्यांवर जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांच्या कार्यकाळात शहरातील रस्ते, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनासारख्या मूलभूत सुविधांवर भर देण्यात आला. विशेषतः कोविड-१९ महामारीदरम्यान त्यांनी अनेक मदत मोहिमा राबवल्या, ज्यामुळे त्यांचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून लौकिक वाढला.