पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गँगस्टर गजानन मारणे याला दिलेल्या परवानगीमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि जिल्ह्यात प्रवेशबंदी असलेल्या गजानन मारणे याला मुंबई उच्च न्यायालयाने १५ आणि १६ जानेवारी रोजी पुण्यात येण्याची विशेष परवानगी दिली आहे. गजानन मारणे याची पत्नी जयश्री मारणे या कोथरूड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून महानगरपालिका निवडणूक लढवत आहेत. पत्नीच्या निवडणूक प्रचारात सहभागी होण्यासाठी पुण्यात प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी गजानन मारणे याच्यावतीने न्यायालयात करण्यात आली होती. यापूर्वी गजानन मारणे याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, जामीन मंजूर करताना न्यायालयाने पुणे शहरात प्रवेशास मज्जाव केला होता. मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीय संगणक अभियंत्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या गजानन मारणे मुळशी येथील आपल्या निवासस्थानी वास्तव्यास आहे. गजानन मारणे याला पुणे शहरात प्रवेश दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा आक्षेप पोलिसांनी नोंदवला होता. त्यामुळे खालच्या न्यायालयाने केवळ मतदानाच्या दिवशी आणि न्यायालयीन तारखांनाच पुण्यात येण्याची मर्यादित सवलत दिली होती. मात्र या निर्णयाविरोधात करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करत मुंबई उच्च न्यायालयाने १५ आणि १६ जानेवारी रोजी पुण्यात येण्याची परवानगी दिली आहे. दोन दिवसांसाठी प्रवेशबंदी शिथिल करण्यात आल्याने गजानन मारणे निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार आहे. या निर्णयामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.