Accident – बुधवारी रात्री उशीराने उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग-९ वर झालेल्या भीषण रस्ते अपघातात चार डॉक्टरांचा मृत्यू झाला. डॉक्टरांची भरधाव कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. हे चारही तरुण डॉक्टर श्री वेंकटेश्वर विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत होते. मृतांमध्ये डॉ. अर्णब चक्रवर्ती, डॉ. आयुष शर्मा, डॉ. श्रेष्ठ पांचोली आणि सप्तर्षी दास या चार डाॅक्टरांचा समावेश आहे. अमरोहा जिल्ह्यातील राजबपूर पोलिस स्टेशन परिसरातील उड्डाणपुलाजवळ रात्री १० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. वेगाने येणाऱ्या कारची धडक इतकी भीषण होती की कार पूर्णपणे चिरडली गेली. गाडीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी तासन्तास प्रयत्न करावे लागले. गाडीतील डॉक्टर मेरठहून गाझियाबादला जात होते. मात्र, त्यांना रस्त्याच्या कडेला उभा असलेला साहित्याने भरलेला ट्रक दिसला नाही आणि जेव्हा त्यांना काय घडत आहे हे समजले तेव्हा खूप उशीर झाला होता. चारही डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. गाडी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि गाडीचे तुकडे करून तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. रस्ते अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि गाडीत अडकलेल्या तरुणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. ट्रक कोणत्याही धोक्याच्या सिग्नलशिवाय रस्त्यावर उभा होता. त्यामुळे हा अपघात झाला.