जळगाव : महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. भाजपने एकट्यानेच सुमारे १२९ नगराध्यक्ष पदे आणि ३३०० हून अधिक नगरसेवक जागा जिंकल्या आहेत. शिंदे गटाच्या शिवसेने आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीनेही चांगली कामगिरी करत महायुतीला ७५ टक्के हून अधिक नगराध्यक्ष पदे मिळवून दिली आहेत. या निवडणुकीत वयाच्या दोन्ही टोकांना विक्रम घडले. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद नगरपंचायतीत भाजपच्या ७७ वर्षीय जनाबाई भगवान रंधे यांनी नगरसेवक म्हणून विजय मिळवला. मतमोजणी संपल्यानंतर कार्यालयाजवळ आलेल्या जनाबाईंना जनतेच्या प्रेमाने आणि विश्वासाने अश्रू अनावर झाले. आयुष्यभराच्या संघर्षानंतर ७७ व्या वर्षी मिळालेल्या या यशाने त्या भावुक झाल्या. हा दृष्य हृदयस्पर्शी ठरला. दुसरीकडे, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषदेत शिंदे गटाच्या शिवसेनेच्या २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे यांनी नगराध्यक्षपद जिंकले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या सिद्धीने भाजपच्या अनुभवी उमेदवार शीतल क्षीरसागर यांचा अवघ्या १७० मतांनी पराभव करत इतिहास रचला. त्या राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष ठरल्या असून, मोहोळच्या पहिल्या महिला नगराध्यक्षही झाल्या आहेत. सामान्य कुटुंबातील सिद्धीने एका महिन्यात उमेदवारी अर्ज भरला आणि थेट विजय मिळवला. प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या उमेदवारीवर आश्चर्य व्यक्त केले होते. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदे जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. महायुतीच्या या यशाने आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठीही मोठा संदेश दिला आहे.