तळेगाव ढमढेरे : येथील जगताप वस्ती आणि चौधरी वस्ती परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच, काही दिवसांपूर्वी पाळीव पशुधनावर हल्ल्यांच्या घटनाही घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शिरूर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अखेर एक मादी बिबट्या जेरबंद करण्यात आली असून, त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. वनविभागाच्या वतीने टाकळी भीमा रोडवरील जगताप वस्ती येथे शिवराज जगताप यांच्या शेतात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा बसवण्यात आला होता. सोमवारी सकाळी शेजारील शेतकरी गजानन जगताप शेतात गेले असता, पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने ही माहिती शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांना दिली. माहिती मिळताच वनपरिमंडळ अधिकारी गौरी हिंगणे, नियतक्षेत्र वनअधिकारी प्रमोद पाटील, तसेच वन्यजीव बचाव पथकातील शेरखान शेख, वैभव निकाळजे, अमोल कुसाळकर आणि परमेश्वर दहीरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वैभव ढमढेरे, पोपट जगताप, अमोल ढमढेरे यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या अंदाजे अडीच वर्षांचा मादी प्रवर्गातील आहे. तिची पुढील वैद्यकीय तपासणी करून तिला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात रवानगी करण्यात आली आहे. एकाच वर्षात चार बिबटे जेरबंद! तळेगाव ढमढेरे येथील ढमढेरे वस्ती, चौधरी वस्ती व जगताप वस्ती परिसरातून गेल्या एका वर्षात चार बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. तरीही परिसरात अजून बिबटे असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, वनविभागाने तातडीने अधिक पिंजरे लावून सतत गस्त वाढवावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे.