मुंबई – राज्यातील महापालिका निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. मात्र तत्पूर्वी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे एक्झिट पोल समोर आले असून, ही आकडेवारी पाहता राज्यात भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरणार असल्याचे दिसून येत आहे. तसेच शिवसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचा गड राखल्याचे चित्र आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना मुंबईत, तर अजित पवार यांना पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आपल्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जनमतच्या एक्झिट पोलनुसार पुण्यामध्ये पुन्हा एकदा भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे, पुण्यात भाजपला 93 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर शिवसेनेला 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर ठाकरेसेनेला एकूण सात जागा मिळण्याची शक्यता आहे. पुण्यात अजित पवार यांच्या पक्षाला 43, तर शरद पवार यांच्या पक्षाला 8 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पीआरएबीच्या एक्झिट पोलनुसार पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. येथे भाजपला 64 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 51, शिवसेनेला 9, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 2, काँग्रेसला 1 आणि मनसेला एक जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या महानगर पालिकेत पुन्हा एकदा भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. जेडीएस एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसनेला 44 ते 58 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर राज ठाकरेंच्या मनसेला फक्त 6 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपला सर्वाधिक म्हणजे 87 ते 101 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचवेळी 92 जागा लढवलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला 54 जागा मिळतील, तर 150 जागा लढवलेल्या काँग्रेसला फक्त 16 ते 25 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.