Ankush Kakade : आज राज्यातील २९ महानगरपालिकेसाठी मतदानप्रक्रिया पार पडत आहे. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली असून, सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सकाळपासून सर्वच मतदान केंद्रावर मतदार मतदान करण्यासाठी येत असल्याचे चित्र आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रश्नासनाने खबरदारी म्हणून बंदोबस्त तैनात केला आहे. अशातच पुण्यातून एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याने ईव्हीएम मशिनबाबत आक्षेप नोंदवत गंभीर आरोप केला आहे. राज्यातील काही मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या तक्रारी समोर आल्या असतानाच आता पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदान केंद्रावर पहिल्या तीन मतदानांनंतर चौथ्या मतदानाच्या वेळी मशीनवरील लाईटच लागली नाही, असा मोठा दावा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे मतदान प्रक्रिया योग्य पद्धतीने झाली की नाही, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. महत्वाचे म्हणजे संबंधित ईव्हीएम मशीनमध्ये वेळेचा मोठा फरक आढळून आल्याचा आरोपही काकडे यांनी केला आहे. त्यामुळे निवडणूक प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अंकुश काकडे यांनी केलेल्या मागणीची दखल पालिका प्रशासन आणि निवडणूक आयोग घेणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे. वेळेबाबतही आक्षेप ईव्हीएम मशीनच्या वेळबाबतही अंकुश काकडे यांनी आक्षेप नोंदवला आहे. ईव्हीएम मशीनमध्ये वेळ सात वाजून ४४ मिनिटे दाखवली जात होती, जी प्रत्यक्ष वेळेपेक्षा तब्बल १४ मिनिटांनी जास्त असल्याचा दावा काकडे यांनी केला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे. हेही वाचा : Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं जनतेला आवाहन; मतदानाचं महत्त्व अधोरेखित करणारा व्हिडिओ शेअर