लोणावळा (पुणे) : लोणावळा नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात भाजपच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी थेट अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्यावर निशाणा साधला, पण त्यासाठी वापरलेली भाषा प्रचंड वादग्रस्त ठरली आहे. भाजप नेते चित्रा वाघ यांच्यासमोरच व्यासपीठावरून सुरेखा जाधव म्हणाल्या, “कमळाशिवाय दुसरा पर्यायच नाही, गल्ली ते दिल्ली सगळीकडे भाजप आहे. इथला आमदार आपला नसला तरी त्याचा बाप आपला आहे… मुख्यमंत्री आपला आहे. त्यामुळे सगळीकडे कमळच फुलवा”. असं जाधव म्हणाल्या. त्यांच्या या विधानाने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला, तर सोशल मीडियावर मात्र जोरदार संताप व्यक्त होत आहे. सुनील शेळके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अतिशय जवळचे मानले जातात, त्यामुळे जाधव यांचा हा रोख थेट अजितदादांकडे होता, असे मानले जात आहे. दरम्यान, भाजपमध्ये अंतर्गत बंडखोरीही उघड झाली आहे. कमळ चिन्हावर निवडणूक लढणाऱ्या भाजपच्या काही उमेदवारांनीच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला उघड पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे. यामुळे महायुतीत खदखद असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. लोणावळा नगरपरिषदेच्या रिंगणात भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असला, तरी पक्षांतर्गत आणि युतीतील या कलहामुळे राष्ट्रवादीला फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.