Devendra Fadnavis – महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत महायुतीने मिळवलेल्या बिनविरोध विजयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना कडेकोट प्रत्युत्तर दिले . विरोधकांनी खुशाल न्यायालयात जावे, मात्र जनतेच्या न्यायालयात आमचा विजय झाला आहे आणि कोर्टातही जनतेचाच कौल जिंकेल, असा ठाम विश्वास त्यांनी रविवारी येथे व्यक्त केला. येत्या १५ जानेवारीला राज्यातील महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच भाजप आणि महायुतीच्या मित्रपक्षांनी ६८ जागांवर बिनविरोध विजय मिळवत विरोधकांवर मोठी आघाडी घेतली आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर धाकदपटशहा आणि पैशांचा वापर केल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या बिनविरोध निवडीला न्यायालयात आव्हान देण्याचे संकेत दिले आहेत. चंद्रपूर येथील रोडशो दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, अनेक अपक्ष आणि मुस्लिम उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहेत, मग त्याबद्दल विरोधक मौन का बाळगून आहेत? स्वतःचा पराभव समोर दिसत असल्याने विरोधक आतापासूनच सबबी शोधू लागले आहेत. विकासासाठी महायुतीलाच मतदान करण्याचे आवाहन… चंद्रपूरचा विकास फक्त भाजप-शिवसेनेनेच केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरांच्या विकासासाठी ५० हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. चंद्रपूरच्या विकासासाठीही निधी उपलब्ध करून दिला जाईल. मात्र, हे पैसे योग्य रीतीने वापरायचे असतील तर भ्रष्ट लोकांना महानगरपालिकेत निवडून देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. भाजप व शिवसेनाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस चंद्रपूर दौऱ्या होते. मुख्यमंत्री फडणवीस ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, मंत्री अशोक उइके आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्याउपस्थितीत अंचलेश्वर गेटपासून ते जटपुरा गेटपर्यंत भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले होते.