१) एपस्टीन फाइल्सवरून पृथ्वीराज चव्हाणांचा नवा खुलासा मराठी पंतप्रधानाचा दावा फोल ठरल्यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्रोलिंगला थेट उत्तर दिलंय. १९ डिसेंबरला मराठी माणूस पंतप्रधान होईल, असा दावा त्यांनी केला होता. मात्र तसं काहीच न झाल्याने सोशल मीडियावर त्यांची जोरदार खिल्ली उडवली गेली. साताऱ्यात पत्रकार परिषद घेत चव्हाण म्हणाले, मला ट्रोल केलं तरी चालेल. अमेरिकेतल्या घडामोडींचा भारताच्या राजकारणावर परिणाम होईल, एवढंच मी म्हटलं होतं. एपस्टीन प्रकरणावरून त्यांनी थेट केंद्र सरकारला लक्ष्य केलं. एपस्टीन सेक्स रॅकेट चालवत होता, त्याचा मृत्यू अजूनही संशयास्पद आहे. दबावामुळे फाइल्स बाहेर आल्या, पण त्यात भारतीय नेत्यांची नावं असूनही सरकार गप्प आहे, असा आरोप त्यांनी केला. मोदी आणि एपस्टीनच्या संबंधांवर सरकारने स्पष्ट उत्तर द्यावं, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. २) आमदार पुत्रासह २२ जण भाजपमध्ये; शरद पवारांना ऐन निवडणुकीत धक्का- पुण्यात ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ राबवत राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे यांच्यासह तब्बल २२ जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुण्यात झालेल्या या पक्षप्रवेशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खडकवासला मतदारसंघात आमदार भीमराव तापकीर यांना कडवी झुंज देणारे राष्ट्रवादीचे सचिन दोडकेही भाजपमध्ये गेले आहेत. याशिवाय सायली वांजळे, विकास दांगट यांसारख्या अनेक नेत्यांनीही कमळ हाती घेतलं आहे. हे सर्व पक्षप्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडले. या घडामोडींमुळे पुण्यात भाजपची ताकद वाढली असून, शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. ३) भाजप आमदार पराग शाह यांची मुजोरी; रिक्षा चालकाला लगावली कानशिलात- घाटकोपरमध्ये भाजप आमदार पराग शाह यांचा रिक्षा चालकाला मारहाणीचा प्रकार समोर आलाय. वाहतूक नियम मोडल्याने संतापलेल्या आमदारांनी रिक्षा चालकाला कानशिलात लगावलीय, हा सगळा प्रकार व्हिडीओत कैद झालाय. फुटपाथवरील अतिक्रमण आणि नियम तोडणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात आमदार पराग शाह आंदोलन करत होते. त्याचवेळी चुकीच्या दिशेने रिक्षा चालवत आलेल्या चालकावर त्यांनी हात उचलला. या घटनेवरून काहींचं समर्थन, तर काहींनी तीव्र शब्दात टीका केलीय. नियम तोडले असले तरी आमदारांना कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे का? असा सवाल उपस्थित होतोय. ४) मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार- महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे आघाडीत फूट पडल्याचं चित्र स्पष्ट झालंय. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मुंबईत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला. मुंबईत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून अपेक्षित विकास झाला नाही, त्यामुळे स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक आता आणखी चुरशीची होणार आहे. ५) काँग्रेसचे आबा बागुल यांचा शिवसेनेत प्रवेश पुणे महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा झटका बसलाय. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी उपमहापौर आबा ऊर्फ उल्हास बागुल यांनी काँग्रेसला रामराम ठोकत थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. बागुल कुटुंबीयांसह काँग्रेसचे अनेक माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झालेत. त्यामुळे पुण्यात शिंदे गटाची ताकद वाढल्याचं चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने आबा बागुल नाराज होते. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेस सोडत नवी राजकीय खेळी केली आहे. सच्च्या कार्यकर्त्याला काँग्रेसमध्ये किंमत उरलेली नाही. आबा बागुल यांनी कायम जनतेसाठी काम केलंय, पुढेही ते शिवसेनेतून तेच काम करतील, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलंय. या प्रवेशामुळे पुण्यातील राजकीय समीकरणं बदलणार, आणि काँग्रेसला स्थानिक पातळीवर मोठा फटका बसल्याचं बोललं जातंय. ६) माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर मोठं संकट तुरुंगात असलेल्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर पुन्हा मोठं संकट आलंय. इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना प्रत्येकी १७ वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आलाय. रावळपिंडीतील विशेष न्यायालयाने ‘तोशाखाना-२’ प्रकरणात हा निकाल दिलाय. महागडा बुल्गारी ज्वेलरी सेट स्वस्तात खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. न्यायालयाने इम्रान खान यांना आपराधिक विश्वासघात प्रकरणात १० वर्षे, तर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार ७ वर्षे, अशी एकूण १७ वर्षांची शिक्षा सुनावलीय. इम्रान खान आणि बुशरा बीबी यांच्यावर १ कोटी ६४ लाख पाकिस्तानी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय दंड न भरल्यास शिक्षा आणखी वाढणार आहे. दरम्यान, इम्रान खान यांचं वय आणि बुशरा बीबी महिला असल्यामुळे शिक्षेत थोडी नरमाई दाखवण्यात आल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. ७) हदी यांच्या दफनविधीसाठी हजारोंची गर्दी ढाका येथे हत्या झालेल्या युवा नेता शरीफ ओस्मान हदी यांच्या दफनविधीसाठी आज हजारोंची गर्दी झाली. संसद परिसरातील साऊथ प्लाझा येथे कडेकोट बंदोबस्तात अंत्यसंस्कार पार पडले. हंगामी सरकारचे प्रमुख सल्लागार मुहम्मद युनूस, लष्करप्रमुख जनरल वाकर-उझ-झमान यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. अखेरच्या प्रार्थनेवेळी उपस्थित जमावाकडून भारतविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. धार्मिक विधीनंतर हदी यांना ढाका विद्यापीठाच्या आवारात, राष्ट्रीय कवी काझी नझरुल इस्लाम यांच्या समाधीशेजारी दफन करण्यात आले. हदी हे इन्कलाब मनचाचे प्रवक्ते आणि गेल्या वर्षीच्या विद्यार्थी आंदोलनातील प्रमुख चेहरे होते. १२ डिसेंबरला प्रचार सुरू करत असताना बुरखाधारी हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. उपचारादरम्यान गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बांगलादेशात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. ८) उत्तर प्रदेशात कोडिनयुक्त कफ सिरपवर कारवाई उत्तर प्रदेशमध्ये कोडिनयुक्त कफ सिरपवर मोठी कारवाई करण्यात आलीय. ३१ जिल्ह्यातील या रॅकेटमधून आतापर्यंत ७५ जणांना अटक झालीय. ७४ गुन्हे नोंदले गेले आहेत. १२.६५ लाख बाटल्या जप्त झाल्या आहेत आणि १३२ कंपन्यांवर कारवाई सुरू आहे. एसआयटीने १५ मुख्य सूत्रधारांना पकडलंय आणि १२ आरोपींवर लुक-आउट सर्क्युलर जारी केलंय. बनावट बिलांच्या साहाय्याने कफ सिरप गैर-वैद्यकीय वापरासाठी नेपाळ-बांगलादेशला पाठवल्याचं संशय आहे. काही आरोपी समाजवादी पक्षाशी जोडलेले आहेत असं मंत्री सुरेश खन्ना म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, ही कारवाई चालूच राहणार आहे. ९) धर्मेंद्र यांचा अखेरचा व्हिडीओ व्हायरल मनोरंजन विश्वातला हीमॅन धर्मेंद्र आता आपल्यात नाहीत. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईत त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यानं चाहते भावूक झाले आहेत. दरम्यान, धर्मेंद्र यांचा अखेरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही क्लिप स्वतः त्यांचा धाकटा मुलगा, अभिनेता बॉबी देओलनं शेअर केलीय. हा व्हिडीओ धर्मेंद्र यांच्या शेवटच्या चित्रपट ‘इक्किस’च्या शूटिंगमधला आहे. रॅप-अप व्हिडीओमध्ये धर्मेंद्र संपूर्ण टीमचं आभार मानताना दिसतात. चित्रपटाचा भाग होता आलं, याचा आनंद असल्याचं ते सांगतात. “शूटिंग संपतंय याचा आनंद आहे, पण थोडं दुःखही आहे. सगळ्यांवर खूप प्रेम आहे,” असं म्हणत त्यांनी माफीही मागितली. हा व्हिडीओ पाहून चाहते भावूक झाले असून, बॉबी देओलनं “Love you papa” अशी कॅप्शन देत ही क्लिप शेअर केलीय. १०) टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी भारताचा संघ जाहीर- येत्या ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी बीसीसीआयने शनिवारी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. या संघातून शुबमन गिल आणि जितेश शर्माला वगळले असून त्यांच्या जागी रिंकू सिंग आणि इशान किशनला संधी देण्यात आली आहे. या संघाचे नेतृत्त्व सूर्यकुमार यादव करेल, तर अक्षर पटेल उपकर्णधार असेल. या निवडीत इशान किशनचे २ वर्षांनंतर पुनरागमन हे सर्वात मोठे आकर्षण ठरले आहे. ‘सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी’मध्ये ५१७ धावा कुटून त्याने संघात आपली जागा निश्चित केली. मात्र, खराब फॉर्ममुळे शुबमन गिलला संघातून डच्चू देण्यात आला आहे. संजू सॅमसन आणि इशान किशनच्या रूपाने संघात दोन यष्टीरक्षक आहेत.