Jayant Patil – सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आपला बालेकिल्ला राखत, उरण ईश्वरपूर नगरपरिषदेमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत जयंत पाटील यांनी नगराध्यक्ष पदासह 23 जागा जिंकत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. भाजप, शिंदेसेना, आणि अजित पवार यांच्या पक्षाला केवळ 8 जागा मिळाल्या आहेत. तसेच, आष्टा नगर परिषदेमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने सत्ता मिळवली आहे. जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी नगरपंचायतीवर एकहाती सत्ता आणली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह बापू देशमुख व माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या साथीत आटपाडी नगरपंचायतीवर यु. टी. जाधव यांनी विजय मिळवला आहे. तासगाव नगर परिषदेत माजी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विजया बाबासो पाटील विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भाजपा राष्ट्रवादी अजितदादा गट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या तिन्ही पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. या नगरपालिकेमध्ये माझी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीचे 13 तर, आमदार रोहित पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 11 उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच, शिराळा नगरपंचायतीत भाजप, शिंदेसेना गट महायुतीला एकुण 11 जागा तर, राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा मिळाल्या आहेत. महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पृथ्वीसिंग नाईक 273 मतांनी विजयी झाले आहेत. पलूसमध्ये काँग्रेसने नगररिषदेतील सत्ता कायम राखली आहे. भाजपला याठिकाणी एक जागेवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला चार जागा मिळाल्या आहेत. पलूस नगरपरिषदेत काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांचे वर्चस्व राहिले.