मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ऐन मतदानाच्या तोंडावर पैशांचे मोठ्या प्रमाणात वाटप होत असल्याचे चित्र आहे. उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप केल्याचे आरोप होत असून, काही ठिकाणी यावरून हाणामारीच्या घटनाही समोर आल्या आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत राज्यभरातून तब्बल ९० लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी अकोल्यात ५० लाख रुपयांची रोकड पकडण्यात आली. खदान पोलिसांनी रात्री पेट्रोलिंगदरम्यान गौरक्षण रोड परिसरात ही कारवाई केली. एका तरुणाकडून दुचाकीवरून कापडी पिशवीत पैसे नेले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यश लालवानी असे पकडण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, पुढील पंचनामा व चौकशी सुरू आहे. याशिवाय नवी मुंबईतील सीबीडी बेलापूरमध्ये २० लाख, तर उल्हासनगरमध्येही २० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीदरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, पैशांचा वापर करून मतदानावर प्रभाव टाकण्याच्या प्रयत्नांवर अधिकाऱ्यांनी कडक नजर ठेवली आहे. ऐन निवडणुकीत होत असलेले हे गैरप्रकार लोकशाही प्रक्रियेसाठी गंभीर असल्याचे बोलले जात असून, पुढील काळात आणखी कारवाया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.