Election News : आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीतील चुका दुरुस्त करण्याचे अधिकार आयुक्तांना असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे सचिव काकाणी यांनी पत्र जारी केले आहे. यामुळे नागरिकांच्या हरकती, प्रशासनाच्या निदर्शनास आलेल्या चुकांचे निराकरण पालिका आयुक्तांनी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदारयादीत मोठ्या प्रमाणावर दुबार नावे, मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यावरून थेट निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्ष, मतदारांनी तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत यादीतील चुकांची दुरुस्ती करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे, स्थानिक पातळीवरील हरकती आणि चुकांचे निराकरण आता आयुक्तांना करावे लागणार आहे. पुण्यात मतदारयादीवर सर्वाधिक हरकती आल्या असून बहुतांश हरकती मतदारांची नावे प्रभागा बाहेर गेल्याच्या तसेच बाहेरील मतदार समाविष्ट झाल्याच्या आहेत. मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्याची तपासणी करून संबंधित मतदार योग्य प्रभागात समाविष्ट झालेत की नाही याची खातरजमा करणे आवश्यक आहे. चुकीची नोंद आढळल्यास त्या मतदारांना योग्य प्रभागात समाविष्ट करून अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे बदल करताना केवळ बी.एल.ओ. किंवा तत्सम कर्मचाऱ्यांच्या अहवालावर विसंबून न राहता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पडताळणी करून नोंदी सुधाराव्यात. तसेच, अशा तक्रारींचा निपटारा दुसऱ्याच दिवशी करावा, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांना दिले आहेत. काय आहेत आदेश : निवडणूक आयोगाने मतदारयादीबाबत प्रशासनास कार्यपद्धती निश्चित करून दिली होती. त्यानुसार, विधानसभा निहाय मतदारयादीचे पालिकेच्या संबंधित प्रभागात योग्य प्रकारे विभाजन करण्याची जबाबदारी आयुक्तांकडे दिली होती. प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केल्यानंतर जर त्यात लेखनिकांच्या चुका झाल्या असतील, दुसऱ्या प्रभागातील मतदार समाविष्ट झाले असतील किंवा ०१ जुलै २०२५ च्या विधानसभा मतदारयादीत नावे असूनही ती संबंधित प्रभागात समाविष्ट नसतील तर अशा बाबींची दखल घेऊन अंतिम मतदारयादीत दुरुस्ती करणे आवश्यक आहे. प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतरही चुका असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले, तर त्याची दुरुस्ती स्वतःहून (सूमोटो) करावी. या दुरुस्तीसाठी हरकतींची वाट पाहण्याची आवश्यकता नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. पुण्यात सर्वाधिक तक्रारी : मतदारयादीबाबत पुण्यात ७७७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे, महापालिका तसेच निवडणूक आयोगाकडे अनेक राजकीय पक्षांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. पालिकेने यापूर्वी मतदार विभागणी निवडणूक आयोगाच्या सेक्शन चार्टनुसारच केल्याचे सांगत चूक आयोगाच्या सॉफ्टवेअरमध्ये असल्याचे नमूद केले होते. आता आयोगाने सुधारीत आदेश काढत या चुकांच्या दुरुस्तीची जबाबदारी महापालिका आयुक्तांवर टाकली आहे.