मुंबई – आम आदमी पक्षाने (आप) आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सर्व २२७ जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा करताना २१ उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर केली. भारताचे प्रमुख शहर असतानाही मुंबईची अवस्था बिकट आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वार्षिक बजेट 75 हजार कोटी रुपये असूनही नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक सेवा मिळत नाहीत. देशातील सर्वाधिक कर भरणाऱ्या मुंबईकरांना निकृष्ट सुविधा मिळत असल्याचा आरोपही आपने यावेळी केला. आपच्या मुंबई युनिटच्या प्रमुख प्रीती शर्मा मेनन यांनी बीएमसी भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेचे केंद्र बनल्याचा आरोप करताना प्रत्येक राजकीय पक्षाने सार्वजनिक हिताऐवजी स्वार्थाला प्राधान्य दिले, असे म्हणताना आप हा केवळ पर्याय नसून तोच उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. बीएमसीमध्ये प्रामाणिक आणि सक्षम लोकांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली व पंजाबमध्ये शिक्षण, आरोग्य, पाणी आणि वीज क्षेत्रात सुधारणा केल्याचा दाखला देताना, मुंबईतही प्रशासन सुधारण्याची क्षमता आपकडे असल्याचा विश्वास मेनन यांनी व्यक्त केला.