AIMIM । Asaduddin Owaisi : सोलापूरमध्ये मंगळवारी सायंकाळी एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा झाली. यावेळी पक्षाचे २२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, सभेत भाषण करताना माजी नगरसेवक गाजी जहागीरदार यांना भावनांचा बांध फुटला आणि ते फारूक शाब्दी यांना पुन्हा पक्षात आणण्याची विनंती करत रडू लागले. ओवैसी यांनी त्यांना धीर देत, मी मेलो तरी एमआयएम चालू राहील, पक्षातून कोणी गेले तरी रडायचं नाही, असा उपरोधिक सल्ला दिला. महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शहर व जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दी यांनी राजीनामा दिल्याने पक्षाला धक्का बसला आहे. ओवैसी यांनी हा राजीनामा स्वीकारला नसल्याचे स्पष्ट करत, निवडणुकीनंतर शाब्दी कुटुंबाशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला.! महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडालेला असतानाच, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना आज बायजीपुरा-जिन्सी भागात घडली. संतप्त जमावाने धावत्या वाहनातून जलील यांना बाहेर काढून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावावर लाठीमार केला आहे. जलील यांची रॅली बायजीपुरा परिसरातून जात असताना काही जणांनी सुरुवातीला काळे झेंडे दाखवून निषेध केला. मात्र, काही वेळातच शंभरहून अधिक लोकांच्या जमावाने जलील यांच्या वाहनावर हल्ला चढवला. या हल्ल्यात जलील यांच्या गाडीच्या मागील सीटवर बसलेल्या एका व्यक्तीच्या डोळ्याला दुखापत झाली असून, एमआयएमचा एक कार्यकर्ताही जखमी झाला आहे.