Election 2026 – स्वतःची प्रतिमा देवाभाऊ अशी निर्माण करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्यक्षात ‘टक्का भाऊ’ असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. नागपूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या निमित्ताने नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सपकाळ यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जात होते. या योजनेच्या प्रचारावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी गुलाबी जॅकेट घालून प्रचार केला आणि फडणवीस यांची प्रतिमा देवाभाऊ म्हणून उभी केली गेली. मात्र, या प्रचारामागे भ्रष्टाचार लपवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्य सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर कमिशनखोरी सुरू असून प्रत्येक कामासाठी ३५ टक्के कमिशन घेतले जात असल्याचा दावा सपकाळ यांनी केला. शासकीय योजना, उत्खनन परवाने तसेच शासकीय व वादग्रस्त जमिनींच्या वाटपात खुलेआम आर्थिक व्यवहार होत असल्याचे त्यांनी सांगितले. अंमलीपदार्थांच्या व्यवहारांसह काही गुन्हेगारी धंद्यांत सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष सहभागी असल्याचाही आरोप त्यांनी केला. सरकार जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असून सत्तेचा वापर मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी केला जात असल्याचे सपकाळ म्हणाले. नागपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस हे मुद्दे ठामपणे जनतेसमोर मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.