मुंबई : महापालिका निवडणुकीतील सलग प्रचार दौऱ्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. गेल्या महिनाभरातील प्रचंड धावपळीमुळे त्यांची तब्येत बिघडली असून, डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे शिंदे यांनी आजचे सर्व नियोजित कार्यक्रम राखीव ठेवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रकृती अस्वस्थ असल्याने एकनाथ शिंदे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही उपस्थित राहू शकले नाहीत. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना आधीच कल्पना दिली होती. निवडणूक प्रचारादरम्यान मुंबईसह राज्यातील सर्व प्रमुख महापालिकांमध्ये त्यांनी सलग सभा घेतल्या होत्या. या सततच्या प्रवासामुळेच त्यांची तब्येत बिघडल्याचे सांगितले जात आहे. कॅबिनेट बैठकीला गैरहजेरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शनिवारी दिवसभर विश्रांती घेण्याचा निर्णय शिंदेंनी घेतला आहे. त्यामुळे सर्व राजकीय व प्रशासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर होते. बारामती येथे कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रम असल्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकले नसल्याची माहिती आहे. शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेने 90 जागांवर उमेदवार दिले होते, त्यापैकी 29 जागांवर विजय मिळवला आहे. निकालानंतर सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी एक विशेष रणनीती आखल्याची चर्चा आहे. निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना सत्तास्थापनेपर्यंत एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यात भाजपचा ‘स्ट्राईक रेट’ चर्चेत दरम्यान, ठाण्यात भाजपने कमी जागा लढवूनही जास्त नगरसेवक निवडून आणल्याचा दावा भाजप आमदार संजय केळकर यांनी केला आहे. ठाण्यात भाजपने 39 जागा लढवल्या असून त्यापैकी 28 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपचा स्ट्राईक रेट सर्वाधिक असल्याचे भाजप नेते निरंजन डावखरे यांनी म्हटले आहे. निवडणुकीनंतरच्या या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला असून, शिंदेंच्या प्रकृतीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.