Eknath Shinde : राज्यातील महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पुण्यात महायुती अंतर्गत रस्सीखेच सुरू असताना आणि मुंबईत ‘ठाकरे विरुद्ध भाजप-शिंदे’ असा सामना रंगलेला असतानाच, अकोल्यात मात्र प्रचाराची पातळी खालवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत विखारी शब्दांत टीका केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उमरी येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना नितीन देशमुख यांची जीभ घसरली. “एकनाथ शिंदे म्हणजे भगव्या आड लपलेला सैतान” त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘भगव्या आड लपलेला सैतान’ असा केला. “शिंदे हे केवळ गद्दार नसून ते सैतान आहेत. त्यांच्या पक्षाचे आयुष्य हे कोंबडीच्या आयुष्याइतकेच आहे. ज्या दिवशी भाजप त्यांना ‘कापून’ खाईल, त्या दिवशी त्यांचा अंत होईल,” अशी बोचरी टीका देशमुखांनी केली. देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा : देशमुख यांनी केवळ मुख्यमंत्र्यांनाच नव्हे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले. “राज्यात जाती-जातीत भांडणे लावणारे फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत. ‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा महापालिकेत चालणार नाही, म्हणूनच त्यांनी मराठा, ओबीसी, एससी आणि एनटी समाजात भिंती उभ्या केल्या आहेत,” असा आरोप त्यांनी केला. “गुजरातचे दोन बनिया…” प्रचारादरम्यान देशमुखांनी केंद्रातील नेत्यांवरही प्रहार केला. “गुजरातचे दोन बनिया देशात बनवाबनवी करत आहेत,” असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर नाव न घेता टीका केली. त्यांचे विधान चांगलंच गाजलं असून, विरोधक यावर काय प्रतिक्रया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.