मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वीकारले नाहीत, असा आरोप करत आठ इच्छुक उमेदवारांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. भाजप आमदार आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशावरून हे अर्ज फेटाळण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होणार आहेत. याचिकाकर्त्यांनी प्रभाग क्रमांक २२४ ते २२७ साठी आवश्यक कागदपत्रे आणि सुरक्षा ठेवीसह उमेदवारी अर्ज सादर केले होते. मात्र, नार्वेकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर हे अर्ज स्वीकारू नयेत असा दबाव टाकल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. हे सर्व प्रभाग दक्षिण मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघात येतात. नार्वेकर यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा आणि राजकीय अधिकाराचा गैरवापर करून मुक्त व निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला, तसेच पोलिस यंत्रणेमार्फत उमेदवारांना रिटर्निंग अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून बाहेर काढण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. उमेदवारांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर ही याचिका दाखल करण्यात आली असून, योग्य वेळी सुनावणी घेतली जाईल, असे न्यायालयाने सांगितले. दरम्यान, नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर, बहीण गौरी शिवलकर आणि मेहुणी हर्षिता शिवलकर हे अनुक्रमे प्रभाग क्रमांक २२५, २२६ आणि २२७ मधून निवडणूक लढवत आहेत. विरोधी पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन, नामांकन प्रक्रियेत हस्तक्षेप आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड झाल्याचे आरोप केले असून, नार्वेकर यांनी हे आरोप फेटाळले आहेत.