काही वर्षांपूर्वी एका एकपात्री कार्यक्रमात एका कलाकाराने बहुतेक राजकीय नेत्यांची खिल्ली उडवली होती. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा राजकारणात सक्रिय झाल्या असल्यामुळे त्यांचाही विषय आला. प्रियंका गांधी यांना काँग्रेसमध्ये प्रमुख भूमिका मिळाली पाहिजे अशी काँग्रेसमधील नेत्यांची मागणी आहे. त्याचे कारण काय तर त्या त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसतात. तसे तर मग जयराम रमेशही दिसतात असे म्हणत आणि आणखी एक दोघांची नावे घेत तेही इंदिरा गांधी यांच्यासारखे दिसतात असे नमूद करत संबंधित कलाकाराने विनोद केला. त्याने टाळ्या आणि हशे वसुल केले. त्याला बरेच दिवस झाले. आता पुन्हा एकदा तोच विषय म्हणजे प्रियंकांचा विषय चर्चेला आहे. विशेष म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांची नेहमीप्रमाणेच त्यांना मागणी आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहेतच, तथापि, देशातील राजकीय घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवणार्या वर्गालाही मनोमनी प्रियंका यांची काँग्रेसमधील भूमिका अधिक व्यापक असावी असे वाटते. त्यांचे नाक आणि केशभूषा आजीसारखी आहे म्हणून नाही तर बर्याच काळांनी संसदेत काँग्रेसकडून भाषण करणारा कोणी नेता जर नॅचरल आणि प्रभावी वाटला असेल तर त्या प्रियंका गांधी आहेत, म्हणून त्यांच्या व्यापक भूमिकेची अपेक्षा केली जाते आहे. सोनिया गांधी यांनी प्रदीर्घ काळ काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले. त्यांनी कमान हाती घेतली तेव्हाही काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप होते. त्यातच पक्षाचे केंद्रातले सरकार गेले आणि आघाड्यांच्या राजकारणाचे युग सुरू झाले. सोनियांनी व्यापक आघाडी स्थापन करत काँग्रेसला पुन्हा सत्तेवर आणले. दरम्यानच्या काळात प्रकृती अस्वास्थ्य आणि पुढच्या पिढीकडे धुरा सोपवण्याची प्रक्रियाही त्यांनी संयमीपणे सुरू केली आणि आपल्या खासदार पुत्राकडे हळूहळू जबाबदार्यांचे हस्तांतरण करण्यात सुरुवात केली. हे करताना काँग्रेसमध्ये एकाच वेळी तीन सत्ताकेंद्रे निर्माण होणार नाहीत याची दक्षता त्यांनी घेतली. राहुल गांधी यांच्याकडे जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांचा सल्लेवजा किंवा त्यापेक्षाही अधिक हस्तक्षेप राहिला असूही शकतो, मात्र पक्षात गोंधळाचेच वातावरण निर्माण होईल एवढ्या त्या केंद्रस्थानी राहिल्या नाहीत. त्याचवेळी त्यांनी ही पण दक्षता घेतली की प्रियंका गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे केवळ काँग्रेसजनांनाच नाही तर देशातील सामान्य जनतेलाही जे आकर्षण आहे त्यामुळे राहुल यांना अडचण होऊ नये यासाठी प्रियंका यांना बॅकसीटवरच ठेवले. आपल्या आईचा आणि भावाचा मतदार संघ हाताळणे एवढ्यापुरतेच प्रियंका यांनीही स्वत:ला मर्यादित ठेवले. किंबहुना तशी ठरवून व्यवस्था केली गेली होती. सततच्या पराभवांमुळे अखेर त्यांना सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली गेली. उत्तर प्रदेशपासून संसदीय राजकारणाचा श्रीगणेशा करण्याची गांधी कुटुंबाची परंपरा आहे. त्यानुसार प्रियंका यांच्याकडे उत्तर प्रदेश दिले गेले. त्यांनीही ‘लडकी हुं, लढ सकती हूं’ हे नवे लक्षवेधी अभियान सुरू केले. मात्र गेल्या दहा वर्षांतील देशाच्या राजकारणात नरेंद्र मोदी यांचा प्रभाव एवढा सर्वत्र आहे की अनेक मोठे, उदयोन्मुख आणि उज्ज्वल भविष्य असलेले नेते त्यात झाकोळले गेले. केवळ राहुल आणि प्रियंकाच नाही, अनेक नेत्यांची किंबहुना प्रत्येक राज्यातील अशा अनेक नेत्यांची नावे घेता येतील. तो विषय वेगळा, मुद्दा असा की प्रियंकांना उत्तर प्रदेशने तेव्हा स्वीकारले नाही. त्यामुळेच नंतर जेव्हा त्यांना संसदेवर पाठवण्याचा निर्णय झाला तेव्हा राहुल यांनी सोडलेली वायनाडची जागा त्यांच्याकरता निश्चित केली गेली. राहुल यांनी रायबरेली सोडली असती व प्रियंकांनी तेथून सुरुवात केली असती तर कदाचित काँग्रेससाठी आज चित्र अधिक सकारात्मक राहिले असते. संसदेच्या आज समाप्त झालेल्या अधिवेशनात वंदे मातरम्वर चर्चा झाली. या चर्चेत अनेकांनी भाषणे केली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रियंका गांधी यांची भाषणे लक्षवेधी ठरली. मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला. विरोधी पक्षनेते म्हणून राहुल यांच्याकडून त्याला उत्तर येणे अपेक्षित होते. मात्र ती जबाबदारी प्रियंका यांनी पार पाडली. केवळ पार पाडली नाही तर सक्षमपणे पार पाडली. नवी तथ्य आणि तर्क मांडत अवास्तव आक्रमक न होताही सरकारला पिंजर्यात उभे करता येऊ शकते हे त्यांनी दाखवले. त्यांचा प्रभाव विरोधी पक्षांवर आणि जनमनसावर पडला आणि काँग्रेसही त्याला अपवाद राहू शकत नाही. त्यामुळेच पुन्हा राहुल-प्रियंका तुलना आणि भविष्यातील शक्यतांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. एका नेत्याने प्रियंकांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करावे अशी मागणी केली. चर्चा वाढत जाऊ नये म्हणून वेळीच खबरदारी घेत त्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी झाली आहे. तरीही तुलना होणार आणि पक्षाच्या भवितव्यासाठी ते होणे अपरिहार्य आहे. त्यातून आता काँग्रेसला व विशेषत: सोनिया गांधींना मार्ग काढावा लागेल. राहुल यांच्याकडे पक्षाची जबाबदारी आली तेव्हा त्यांचीही द्विधा स्थिती होती. सोनिया गांधींची काँग्रेस जैसे थे ठेवायची की आपल्याला हवी तशी काँग्रेस तयार करायची. त्यावर त्यांना अद्याप निर्णय घेता आलेला नाही व याचाच परिणाम पक्षाने ज्या वेगाने निर्णय घेणे अपेक्षित होते ते घेतले गेले नाहीत. त्याची परिणती नेत्यांची गळती आणि पक्षसंघटना दुबळी होण्यात झाली. प्रियंका यांची सहज संवाद शैली, मुद्देसूद मांडणी, लोकांना आणि कार्यकर्त्यांना असलेले त्यांचे आकर्षण आणि त्यांची एक नेता म्हणून असलेली कोरी पाटी या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्याचा योग्य वेळीच उपयोग झाला, तर काँग्रेसला लाभ होऊ शकतो.