Sonia Gandhi | Rahul Gandhi – नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. विशेष न्यायालयाने त्या प्रकरणात नुकताच कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांना दिलासा दिला. त्या निर्णयाला ईडीने आव्हान दिले आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातील मनी लॉण्डरिंग संदर्भात ईडीकडून याआधी आरोपपत्र दाखल करण्यात आले. मात्र, त्या आरोपपत्राची दखल घेण्यास दिल्लीतील विशेष न्यायालयाने नकार दर्शवला. संबंधित आरोपपत्र खासगी तक्रारीवर आधारित आहे. ते नमूद केलेल्या गुन्ह्याशी निगडीत एफआयआरवर आधारलेले नाही, असे त्या न्यायालयाने अधोरेखित केले. संबंधित निर्णयाला आव्हान देण्याचे संकेत याआधीच ईडीकडून देण्यात आले होते. आता त्या केंद्रीय यंत्रणेने उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली आहे. त्यावर पुढील काही दिवसांत सुनावणी होऊ शकेल. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात फसवणूक आणि मनी लॉण्डरिंग झाल्याचा ईडीचा आरोप आहे. त्याप्रकरणी कॉंग्रेसच्या इतर काही नेत्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.