Raksha Khadse : राज्यात २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या नगरपरिषदा आणि नगरपंचयातीच्या निवडणुकीची रंगत वाढताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण निवडणुकीच्या अनुषंगाने चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. एकेकाळी एकाच पक्षात सोबत काम केलेले एकनाथ खडसे आणि गिरीष महाजन एकमेकांवर टीका करत आहेत. दोन्ही नेते जळगाव जिल्ह्यातून येत असल्याने त्यांचा स्थानिक पातळीवर देखील वरचष्मा आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने खडसे विरुद्ध महाजन यांच्यात शाब्दिक युद्ध रंगल्याचे पाहायला मिळत आहे. या साऱ्यात आता केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एकीकडे सासरे आणि दुसरीकडे वडिलांसारखे असलेले पक्षाचे नेते या दोघांच्या वादामुळे आपली घुसमट होत असल्याची प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी दिली आहे. त्या म्हणाल्या, ‘, माझं सँडविच होतं’. सासरे म्हणून एकनाथ खडसे यांचा आदर आहे, तर गिरीष महाजन हे वडिलांसमान आणि पक्षाचे नेते असल्याने तेही जवळचे आहेत.’, असे रक्षा खडसे म्हणाल्या आहेत. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. जळगावच्या चोपडा येथील प्रचारसभेसाठी आल्या असता रक्षा खडसेंनी हे विधान केले. नेमकं काय म्हणाल्या रक्षा खडसे? “एकीकडे नाथाभाऊ सासरे आहेत, तर दुसरीकडे मंत्री गिरीषकाका वडिलांसारखे आहेत. दोघांच्या वादामुळे माझा सँडविच नक्कीच होतो. ” महाविकासआघाडी आणि महायुती नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहेत. या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडीसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यामुळे बड्या नेत्यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने कोणतीही गोष्ट सुटू नये यासाठी म्हणून मोठी आखणी केली जात आहे. महायुतीमधील घटक पक्षांनी या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी केली असल्याचे अगोदरच जाहीर केले होते. पण महाविकास आघाडीतील घटक पक्षांना या निवडणुकीसाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती अशीच काहीशी आहे. हेही वाचा : “…असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत १००% शिजत असणार”; केंद्रीय मंत्र्यांच्या ‘त्या’ विधानाचा राज ठाकरेंनी घेतला समाचार