मुंबई : आज ६ डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या अनुयायांचा जनसागर उसळला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून मोठ्या संख्येने आंबेडकरांचे अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक कधी पूर्ण होईल याचे अपडेट्स फडणवीसांनी दिले. पुढच्या वर्षी ६ डिसेंबरपर्यंत हे स्मारक पूर्ण करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. फडणवीस म्हणाले, पुढच्या वर्षभरात इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्याचा आपला मानस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे पुढील महापरिनिर्वाण दिनापर्यंत पूर्ण करण्यात येईल. यामध्ये ४५० फूट उंचीचा त्यांचा पुतळा असेल. सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे ५० टक्के काम झाले असून पुतळ्याची उभारणी हे प्रकल्पातील आव्हान आहे. शंभर फुटांचा पायथा आणि ३५० फूट उंच पुतळा असे एकंदरीत भव्य स्मारक असणार आहे. या स्मारकातील प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्र, वाचनालय, प्रेक्षागृह, वाहनतळाची शंभर टक्के स्ट्रक्चरल कामे झाली आहेत. सध्या या प्रकल्पातील अंतर्गत सजावटीची कामे प्रगतिपथावर आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यदिव्य स्मारक खुले होणार आहे असे त्यांनी म्हटले. बाबासाहेबांची वैचारिक दृष्टी मोठी होती. आपल्या देशात समाजात एक प्रचंड मोठी विषमता तयार झाली होती. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हिरावून घेतला होता. या विषमतेला आपली शक्ती बनवून बाबासाहेबांनी ज्ञान संपादन केले आणि समाजाला जागृत केले आणि या देशाला संविधान दिले. त्यामुळेच आपला भारत देश प्रगती करू शकला, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा दिला.