Donald Trump – अमेरिका आणि इस्रायलने युद्ध छेडलेल्यापासून निर्माण झालेला दबाव कायम ठेवण्यासाठी इराणने इस्रायल आणि आखाती देशांवरील आपल्या हल्ल्यांमध्ये मोठी वाढ केली आहे. या युद्धामुळे तेलाच्या किंमती भडकल्या असून तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण येतो आहे. इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मारा करण्याबरोबरच इराण उर्जा वियषक प्रकल्प आणि होर्मूझच्या सामुद्रधुनीतून तेल वाहतूक करणाऱ्या जहाजांवरवरही हल्ले करत आहे. यामुळे तेलाच्या किंमती भडकल्या असून कूड तेलाच्या किंमती काल प्रति बॅरल १२० डॉलरपर्यंत पोचल्या होत्या आज हे दर प्रति बॅरल ९० डॉलर होते. युद्ध सुरू झाल्यापासून तेलाच्या दरांमध्ये २४ टक्क्यांची वाढ झाली. हे युद्ध किमान महिनाभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ चालेल, असे म्हणणारे ट्रम्प आता हा एक अल्पकालीन प्रवास असू शकतो, असे म्हणायला सुरुवात केली आहे. त्यामुळे युद्धाचा ककार्यक्रम गुंडाळण्याचा त्यांचा हेतू दिसतो आहे. मात्र इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी इस्रायलवरील हल्ले सुरूच राहतील, असे म्हटले आहे. इराणी नागरिकांना जुलुमशाहीतून बाहेर काढणे हे आमचे उद्दिष्ट आहे. पण सरतेशेवटी ते इराणी जनतेवरच अवलंबून आहे, आतापर्यंतच्या कारवाईमुळे इराणची हाडे मोडली जात आहेत, हे उघड आहे, असे नेतान्याहू यांनी सांगितले. Donald Trump Next Target: आखाती देशांमधील इराणी हल्ले सुरूच : दुबई आणि बहरिनमध्ये इराणी क्षेपणास्त्रांचे इशारे देणारे सायरन वारंवार वाजवले गेले. बहरिनची राजधानी मनामामध्ये एका रहिवासी इमारतीवर इराणी क्षेपणास्त्र पडले आणि २९ वर्षीय महिला ठार झाली आणि अन्य ८ जण जखमी झाले आहेत. सौदी अरेबियाच्या पूर्व भागात डागल्या गेलेली दोन ड्रोन पाडल्याचे सौदी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्याच प्रकारे इराणचे ६ ड्रोन पाडल्याचे कुवेतच्या नॅशनल गार्डनीही म्हटले आहे. आज सकाळी जेरुसलेममध्ये सायरन वाजवले गेले आणि तेल अवीवमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. इराणच्या क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी हवाई संरक्षण प्रणाली कार्यरत झाल्याचे इस्रायलच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. इराणकडून धमकीची भाषा… आम्हाला युद्धबंदी नकोच आहे. आक्रमण करणाऱ्यांच्या तोंडावर बुक्की मारली गेली, तरच धडा शिकतील आणि पुन्हा कधीही पुन्हा इराणवर हल्ला करणार नाहीत, असे इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बाघेर कालिबाफ यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे इराणचे सुरक्षा अधिकारी अली लारिजानी यांनी थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाच धमकी दिली आहे. इराण तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही. तुमच्यापेक्षाही मोठ्यांनाही इराणला संपवता आलेले नाही. काळजी घ्या. स्वतःला संपवून टाकू नका, असे त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या हत्येचा पूर्वी कट करण्याचा आरोप इराणवर केला जातो आहे. अन्य मार्गाने तेल वाहतूक : पर्शियन आखात आणिओमानच्या आखाताला जोडणाऱ्या होर्मूझची सामुद्रधुनी इराणने बंद करून टाकल्यानंतर हिंद महासागरापर्यंतची सागरी वाहतूक ठप्प झाली आहे. जहाजांवरच्या हल्ल्यांमुळे आतापर्यंत किमान ७ खलाशी मारले गेले आहेत. एईच्या किनाऱ्याजवळ पर्शियन आखातामध्ये मंगळवारी काही जहाजांवर हल्ले झाले, असे ब्रिटीश लष्कराकडून देखरेख केल्या जाणाऱ्या मॉनिटरींग सेंटरने सांगितले. पण ट्रम्प यांनी या हल्ल्यांमुळे वाहतूक ठप्प झाल्याचे नाकारले. होर्मूझच्या सामुद्रधुनीमध्ये अशा हल्ल्यांना अमेरिकेकडून आतापर्यंत जेवढा हल्ला केला गेला आहे, त्याच्या तब्बल २० पट अधिक जोरदार उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. पण होर्मूझच्या सामुद्रधुनीमधून एकाही जहाजालाजाऊ दिले जाणार नाही, असे रिव्होल्युशनरी गार्डने म्हटले आहे. तर तेलाच्या टँकरना आता होर्मूझ सामुद्रधुनी टाळून दुसऱ्या मार्गाने जाऊ दिले जात असल्याचे सौदी अरेबियातील तेल कंपनी अरामकोचे अध्यक्ष आणि सीईओ अमीन नासेर यांनी म्हटले आहे. पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पाईपलाईनद्वारे पुर्ण क्षमतेने दिवसाला ७ दशलक्ष बॅरल इतक्या तेलाची वाहतूक केली जाईल. हे तेल या आठवड्यात लाल समुद्रातील यान्बू बंदरात आणले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. दुसऱ्या मार्गाने तेलाची वाहतूक दीर्घकाळासाठी करावी लागल्यास तेलाच्या किंमती यापुढच्या काळात आणखी वाढू शकतील. जागतिक अर्थकारणावर याचे विपरीत परिणाम होतील, असेही ते म्हणाले. इराणच्या महिला फुटबॉल खेळाडूंना ऑस्ट्रेलियात आश्रय : इराणच्या महिला फुटबॉल संघातील पाच महिला खेळाडूंना ऑस्ट्रेलियात आश्रय दिला गेला आहे, असे ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री टोनी बर्क यांनी ब्रिस्बेनमध्ये पत्रकारांना सांगितले. महिलांच्या आशिया करंडक फुटबॉल स्पर्धेनिमित्त हा संघ ऑस्ट्रेलियात गेला होता. ऑस्ट्रेलियात या संघाने पहिल्या सामन्यापुर्वी इराणी राष्ट्रगीत गायले नव्हते. स्पर्धेतून बाहेर पडल्याने या संघाचे आव्हान संपुष्टात आले. पण युद्धामुळे त्यांना परत मायदेशी जाता आलेले नाही. इतर २१ खेळाडू इराणला परततील की नाही किंवा कधी परततील हे स्पष्ट झाले नाही. इराकमध्ये ५ ठार : आज सकाळी इराकमध्ये किर्कुक शहरात पॉप्युलर मोबिलाईज्ड फोर्सेसच्या ४० व्या ब्रिगेडवरही झालेल्या हल्ल्यात या गटाचे किमान ५ सदस्य मारले गेले आणि ४ जखमी झाले. या हल्ल्यांमागे कोणाचा हात होता हे लगेच स्पष्ट झाले नाही. इस्रायलकडून लेबनॉनमधील हिज्बुल्लाहशी संबंधित ठिकाणांवर हल्ले सुरू आहेत. त्याला उत्तर म्हणून इस्रायलमध्येही हिज्बुल्लाहचे हल्ले होत आहेत. हिज्बुल्लाहने अमेरिकेच्या तळावरही हल्ले केले आहेत. दरम्यान, इस्रायलच्या लष्कराने दक्षिण लेबनॉनमधील सर्व रहिवाशांना त्यांची घरे रिकामी करण्याचे पुन्हा आवाहन केले आणि हिजबुल्लाहविरुद्ध बळाची कारवाई करण्याची योजना आखली असल्याचे म्हटले आहे. युद्ध सुरू झाल्यापासून, इराणमध्ये किमान १,२३० लोक, लेबनॉनमध्ये किमान ३९७ आणि इस्रायलमध्ये ११ लोक मारले गेले आहेत. या युद्धादरम्यान अमेरिकेचे ७ सैनिक मारले गेले आहेत.