Sayaji Shinde | Raj Thackeray – नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरातील साधुग्रामच्या जागेत सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात वृक्षप्रेमी आणि राजकीय पक्षातील नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेत विरोध केला आहे. त्यावर अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. तसेच, सयाजी शिंदे यांनी तपोवनात जाऊन आंदोलन करत शासनाला देखील विनंती केली होती. याचं पार्श्वभूमीवर सयाजी शिंदे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी झालेल्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. आज (सोमवार) सकाळी अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली, यावेळी ते म्हणाले, ज्यांनी ज्यांनी पाठींबा दिला त्यांचे आभार, राज ठाकरेंनी सपोर्ट केला, त्यांच्यासोबत चर्चा झाली, तपोवनमधील झाडे वाचली पाहिजे याबाबत चर्चा करण्यात आली. गिरीश महाजनांनी असे नाही केले पाहिजे, 15 फुटी झाड लावण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. मंत्री पद लेव्हलच्या माणसाला जर हे कळत नसेल तर कस व्हायचं, झाड टिकत नाहीत अशी झाड तोडून काही मिळणार नाही. ते झुडप असो वा वेली असो त्यावरच आपण जगतो. राज ठाकरे माणूस म्हणून मला खूप आवडतात, अनेकदा भेटी झाल्यात, सरकार आपले आहे, आपण त्यांचे आहोत, सगळ्यांनी झाड लावली पाहिजे, असे ते म्हणाले. दरम्यान, तपोवनातील साधुग्रामच्या जागेवरील वृक्ष तोडीचा वाद दिवसेंदिवस चिघळू लागलेला आहे. ज्या ठिकाणी साधुग्राम उभारायचे आहे, त्या ठिकाणी पब्लिक प्रायव्हेट पार्टनर्शीप तत्ववार प्रदर्शन केंद्र, बॅक्वेंट हॉल, रेस्टॉरंट उभारण्याच्या घाट घातला जात आहे. या संदर्भात 220 कोटी रुपयांचे टेंडर महापालिका प्रशासनाने काढले असून 33 वर्षासाठी इथली जागा खाजगी विकासकाला दिली जाणार असल्याचा आरोप केला जात आहे.