Dilip Vengsarkar on Sarfaraz Khan : भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी बीसीसीआयच्या (BCCI) निवड धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घरगुती क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडूनही आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या संधींचे सोने करूनही सर्फराझ खानला सतत डावलले जात असल्याबद्दल वेंगसरकर यांनी निवडकर्त्यांना धारेवर धरले आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतून वगळल्याने आश्चर्य – सर्फराझ खानने २०२३ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पण केले होते. मात्र, २०२४-२५ च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी त्याला भारतीय संघातून बाहेर करण्यात आले. इतकेच नव्हे तर, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या घरगुती कसोटी मालिकांमध्येही त्याला संधी देण्यात आली नाही. सर्फराझने आपल्या फिटनेसवर प्रचंड काम करून वजन कमी केले आहे आणि तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये असूनही त्याला का डावलले जात आहे, असा सवाल वेंगसरकर यांनी उपस्थित केला आहे. आकडेवारी काय सांगते? सर्फराझ खानने आतापर्यंत भारतासाठी खेळलेल्या ६ कसोटी सामन्यांत ३७.१० च्या सरासरीने ३७१ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. वेंगसरकर यांनी धर्मशाला कसोटीची आठवण करून दिली, जिथे सर्फराझ आणि देवदत्त पडिक्कल यांच्या भागीदारीने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. “या मुलाने मिळालेल्या प्रत्येक संधीत स्वत:ला सिद्ध केले आहे, तरीही त्याला कोणत्याही फॉरमॅटमध्ये स्थान न मिळणे अनाकलनीय आहे,” असे वेंगसरकर म्हणाले. हेही वाचा – Ravichandran Ashwin : विराट-रोहितच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेट संपुष्टात येणार? बचावासाठी अश्विनने दिला फिफा मॉडेलचा सल्ला विजय हजारे ट्रॉफीमध्ये धावांचा धडाका – सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना सर्फराझने पुन्हा एकदा निवडकर्त्यांचे लक्ष वेधले आहे. त्याने केवळ तीन डावांत २२० धावा कुटल्या आहेत. यात गोवा संघाविरुद्ध अवघ्या ७५ चेंडूंत ठोकलेल्या १५७ धावांच्या वादळी खेळीचा समावेश आहे. हेही वाचा – IND vs PAK : यंदा भारत-पाकिस्तानमध्ये इतके हाय-व्होल्टेज सामने! कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या एवढ्या मोठ्या प्रतिभेची उपेक्षा करणे लाजिरवाणे! दिलीप वेंगसरकर पुढे म्हणाले की, “तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता, पण त्याला एकही संधी दिली गेली नाही. तो खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी सक्षम आहे. अशा प्रतिभावान खेळाडूला सतत दुर्लक्षित करणे हे खरोखरच दुर्दैवी आणि लाजिरवाणे आहे.”