मुंबई : लंडनमध्ये वास्तव्यास असलेले अनिवासी भारतीय, वैद्यकीय डॉक्टर, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई पोलिसांनी विमानतळावरून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. लंडनहून मुंबईत दाखल होताच ही कारवाई करण्यात आल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. असिम सरोदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. कोविड काळात युट्यूबच्या माध्यमातून सातत्याने वैद्यकीय मार्गदर्शन केल्यामुळे डॉ. संग्राम पाटील चर्चेत आले होते. त्याचबरोबर मोदी सरकारवर निर्भीड आणि टीकात्मक भूमिका मांडत असल्याने ते ओळखले जातात. त्यांच्या या भूमिकेमुळेच ही कारवाई करण्यात आली असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. नेमकं काय घडलं? असिम सरोदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. संग्राम पाटील यांना लंडनहून मुंबईत उतरल्यावर तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले. पहाटे सुमारे २ वाजल्यापासून डॉ. पाटील आणि त्यांच्या पत्नीला चौकशीच्या नावाखाली रोखून ठेवण्यात आले होते. दुपारी सुमारे ३ वाजता त्यांच्याशी संपर्क झाला असून ही कारवाई अन्यायकारक आणि छळवादी असल्याचा आरोप सरोदे यांनी केला आहे. डॉ. संग्राम पाटील हे सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असून सत्य, निर्भीड आणि स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी ते ओळखले जातात. सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, “पोलीस त्यांच्याकडून चांगल्या वागणुकीचा बॉण्ड लिहून घेऊन अटी-शर्तींसह सोडण्याची शक्यता आहे. मात्र कोणतीही अन्यायकारक कारवाई होऊ नये. गरज भासल्यास त्यांना सर्व कायदेशीर मदत दिली जाईल.” डॉ. संग्राम पाटील यांना ताब्यात घेतल्याची माहिती समजताच सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेक पुरोगामी कार्यकर्ते आणि सार्वजनिक जीवनातील मान्यवरांनी सरकारच्या या कारवाईचा निषेध नोंदवला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर येताच अटक करणे ही गंभीर बाब आहे. सडेतोड राजकीय भूमिका मांडणाऱ्या व्यक्तीवर केलेली ही कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची नाचक्की करणारी आहे. अटक नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली, याचा तातडीने खुलासा मुंबई पोलीस आणि गृह मंत्रालयाने करावा. या दडपशाहीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करतो,” असे सपकाळ यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणात पुढे काय भूमिका घेतली जाते आणि पोलिसांकडून अधिकृत खुलासा कधी होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.