Dhruv Shorey most consecutive centuries in List A cricket : विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ मध्ये विदर्भ आणि हैदराबाद यांच्यात झालेल्या लढतीत विदर्भाने ८९ धावांनी शानदार विजय नोंदवला. या विजयापेक्षाही विदर्भाचा ३३ वर्षीय फलंदाज ध्रुव शौरी याने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीची चर्चा सध्या क्रिकेट विश्वात रंगली आहे. ध्रुव शौरीने या सामन्यात १०९ धावांची खेळी करत ‘लिस्ट ए’ क्रिकेटमध्ये सलग ५ शतके झळकावण्याचा मोठा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. एन जगदीशनच्या विक्रमाची बरोबरी – ‘लिस्ट ए’ क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक शतके लगावण्याचा विक्रम आता संयुक्तपणे दोन भारतीय खेळाडूंच्या नावावर जमा झाला आहे. यापूर्वी तमिळनाडूच्या एन जगदीशनने २०२२-२३ च्या हंगामात सलग ५ शतके ठोकली होती. ध्रुव शौरीने २०२४-२५ च्या हंगामातील उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम फेरीत शतके झळकावली होती. त्यानंतर २०२५-२६ च्या चालू हंगामातील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांत शतके झळकावून त्याने जगदीशनच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. या यादीत कुमार संगकारा, देवदत्त पडिक्कल, करुण नायर आणि एलवीरो पीटरसन हे खेळाडू दुसऱ्या स्थानी आहेत. या चौघांनी सलग ४ शतके झळकावली आहेत. विशेष म्हणजे, संगकाराने आपली चारही शतके आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकावली होती. हेही वाचा – AUS vs ENG : बॉक्सिंग डे कसोटीत गोलंदाजांचा तांडव अन् विकेट्सचा पाऊस! ९४ वर्षांनंतर एमसीजीमध्ये घडला असा पराक्रम विदर्भाचा दिमाखदार विजय – राजकोटच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना विदर्भाने निर्धारित ५० षटकांत ३६५ धावांचा डोंगर उभा केला होता. विजयासाठी ३६६ धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ ४९.२ षटकांत २७६ धावांवर गारद झाला. विदर्भाच्या विजयात केवळ शौरीच नाही, तर कर्णधार हर्ष दुबे यानेही महत्त्वाची भूमिका बजावली. हेही वाचा – MUM vs UTT : धक्कादायक! कॅच घेताना रोहितच्या साथीदाराला गंभीर दुखापत, तातडीने स्ट्रेचरवरून नेलं मैदानाबाहेर हर्षने १० षटकांत ३९ धावा देऊन ३ फलंदाजांना तंबूत धाडले. त्याला नचिकेत आणि यश कदम यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेऊन उत्तम साथ दिली. या विजयामुळे आणि ध्रुव शौरीच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे विजय हजारे चषकात विदर्भाचा आत्मविश्वास उंचावला आहे.