Amit Shah : बॅालीवूडचे ‘ही मॅन’ ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील कलाकारांसह राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. नुकतेच नवी दिल्लीत खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्या हिमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. या सभेला बॅालीवूडमधील कलाकारांसह राजकीय नेत्यांनीदेखील हजेरी लावली होती. या प्रार्थना सभेत बोलताना हिमा मालिनी भावूक झाल्या होत्या. त्यांनी धर्मेंद्र यांचे पुस्तक लिहिण्याचे स्वप्न अधुरेच राहिले असल्याचे सांगितले. या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील उपस्थित होते. त्यांनी धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा देत जुन्या आठवणी शेअर केल्या. धर्मेंद्र यांना वैयक्तिकरित्या अमित शाह हे कधीही भेटले नव्हते. मात्र, जेव्हा हेमा मालिनी यांनी खासदाराकीची निवडणूक लढवली होती. त्यावेळी धर्मेंद्र यांनी फोन केला होता. फोन संभाषणात धर्मेंद्र यांनी पत्नीच्या विजयाबद्दलीच चिंता व्यक्त केली होती. तसेच त्यांना एक पत्रही लिहिले होते, या पत्रात त्यांनी हेमा मालिनी त्यांच्या मतदार संघात चांगल्या मताधिक्क्यांनी जिंकतील की नाही, अशी काळजी व्यक्त केली होती, अशी आठवण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रार्थना सभेत बोलताना सांगितली. यावेळी बोलताना अमित शाह यांनी धर्मेंद्र यांच्या काही चित्रपटांचा उल्लेख करत त्यातील त्यांच्या अभिनयाचे कौतुक केले. शोले चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारणाऱ्या धर्मेंद्र यांनी चुपके चुपके सारख्या चित्रपटात अगदी वेगळं पात्र साकारले होते, असेही शाह यांनी आर्वजून सांगितले. प्रार्थना सभेला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासह संसदीय कार्यमंत्री किरन रिजुजू यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली होती. खासदार कंगणा राणौत हिने देखील धर्मेंद्र यांच्याप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या. हेही वाचा : पाकिस्तानला पुतिन यांनी दाखवली जागा, शहबाज शरीफ भेट घेण्यासाठी आले पण घडलं भलतचं