Parli Municipal Council Election : परळी नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीच्या संयुक्त कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेले एक वाक्य सध्या बीड जिल्ह्यात प्रचंड चर्चेचे केंद्रबिंदू ठरले आहे. “गेल्या १० महिन्यांपासून जगमित्र कंपनीचे कार्यालय सुरू आहे… पण आज इथे एक माणूसही नाही,” असे धनंजय मुंडे यांनी सभेत बोलताना म्हटले. हे वाक्य ऐकल्यानंतर सभेतील कार्यकर्ते व उपस्थितांच्याच नव्हे, तर संपूर्ण परळी-बीडमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण ‘जगमित्र कंपनी’ हे नाव थेट मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांच्याशी जोडले जाते. धनंजय मुंडे यांनी नाव घेतले नसले तरी “आज इथे एक माणूस नाही” या वाक्याचा अप्रत्यक्ष रोख वाल्मिक कराड यांच्याकडेच असल्याची जोरदार चर्चा आता सर्वत्र सुरू आहे. वाल्मिक कराड सध्या तुरुंगात असल्याने ते सभेला उपस्थित राहू शकले नाहीत, याचाच दाखला मुंडे यांनी दिल्याचे बोलले जात आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड गेल्या काही महिन्यापासून बीडच्या कारागृहात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचे मुख्य आरोपी म्हणून नाव समोर आल्यापासून धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. तसेच त्यांना आपले मंत्रीपद गमवावे लागले आहे. तरी देखील धनंजय मुंडे यांना परळी नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने वाल्मिक कराड याची आठवण आली आणि ती त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली, याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. याच सभेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी महायुतीच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांना अॅडव्हान्स शुभेच्छा देत, “आम्ही स्वतःचे इगो बाजूला ठेवले आहे, मुंडे साहेबांचे नाव वेगळे करता येणार नाही,” असे सांगितले. तसेच वैद्यनाथ कारखाना सुरू झाला, आता फक्त परळीचा विकास करायचा आहे. विशेष म्हणजे, पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराड यांचा विशेष उल्लेख केला.